बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे हिंदी भाषेतून समालोचन करताना दिसत आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा मालक असणाऱ्या शाहरुखने समालोचनाच्या सुरुवातीला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीत दोन्ही संघ सावध पवित्रा घेवून खेळतील, असा अंदाज वर्तवला. शाहरुख म्हणाला की, चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सुरुवातीला प्रत्येक संघाने सावधपणे खेळ दाखविला आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण सामन्यातही दोन्हीं संघ सावध सुरुवात करतील. यावेळी त्याने पहिल्या दहा षटकात साधारणत: ४० धावा होतील, असा अंदाज वर्तवला. तसेच या दरम्यान भारताला दोन विकेट्स मिळवण्यातही यश येईल, असे तो म्हणाला. शाहरुखचा हा अंदाज कितपत खरा ठरतोय हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
शाहरुख खानला क्रिकेटच्या मैदानावर पाहणे नवीन नाही. आयपीएलच्या मैदानात अनेकदा तो आपल्या संघासोबत दिसला आहे. मात्र भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यादरम्यान तो आकाश चोप्रासह तमाम क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. पडद्यावर आपल्या अंदाजाने चाहत्यांना आनंद देणारा शाहरुख सामन्यादरम्यान कशी फटकेबाजी करतोय हे पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच आहे, असे म्हणावे लागेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मेगा फायनल दोन्हीे देशासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणी आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान बॉलिवूड कलाकाराने हजेरी लावण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यादरम्यान समालोचन केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांच्यानंतर आज शाहरुख इंग्लंडमध्ये समालोचकाच्या भूमिकेत दिसतोय. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील साखळी सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेल्या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच समालोचन करताना दिसला होता.