एखादी किरकोळ चूकही सामन्याचा निर्णय बदलणारी ठरू शकते आणि याचाच प्रत्यय चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत पाहायला मिळाला. सामना संपण्यासाठी ४० सेकंद बाकी असताना भारताच्या गोलरक्षक श्रीजेशने केलेल्या चुकीमुळे भारताला जर्मनीविरुद्ध सलामीच्या लढतीत ०-१ असा पराभव स्वीकारावा लागला.
अतिशय रंगतदार झालेल्या या लढतीत शेवटचे ४० सेकंद बाकी असताना श्रीजेश हा जर्मनीची चाल रोखण्यासाठी पुढे आला. त्याचा फायदा घेत जर्मनीच्या फ्लोरियन फुक्सने सुरेख फटका मारत गोल केला, हाच गोल त्यांना विजयासाठी तारणहार ठरला. हा अपवाद वगळता श्रीजेशने या संपूर्ण सामन्यात अप्रतिम गोलरक्षण केले. अन्यथा हा सामना भारताने किमान दोन गोलांच्या फरकाने गमावला असता.
जर्मनीला तीन वेळा पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. मात्र त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. भारताला १४ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, पण त्याचा फायदा उठवण्यात ते अपयशी ठरले.
इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर विजय
सॅम वर्डने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर इंग्लंडने माजी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा ३-१ असा पराभव करत  सनसनाटी सलामी केली. अन्य लढतीत बेल्जियमने पाकिस्तानला २-१ असे पराभूत केले.
अमेरिकन हॉकी महासंघावर टेरी वॉल्शकडून कारणे दाखवा नोटीस
भुवनेश्वर : अमेरिकन हॉकी संघाचे उच्च कामगिरी संचालक म्हणून काम करताना आपल्यावर गैरव्यवहाराचे खोटे आरोप करत मानहानी केल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी अमेरिकन हॉकी महासंघाला कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. वॉल्श यांनी आपले वकील अन्तोनिओ सराबिया यांच्यामार्फत ही नोटीस पाठविली आहे. वॉल्श हे अमेरिकेत संचालक म्हणून काम करताना आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यास हॉकी इंडियाने नकार दिला होता.