वृत्तसंस्था, चेन्नई : कर्णधार हरमनप्रीत सिंग व वरुण कुमार यांनी झळकावलेल्या दोन गोलच्या जोरावर भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गुरुवारी चीनवर ७-२ असा मोठय़ा फरकाने विजय नोंदवला.

हरमनप्रीतने (पाचव्या व आठव्या मिनिटाला) सुरुवातीच्या सत्रात दोन गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर सुखजीत सिंग (१५व्या मि.), अकाशदीप सिंग (१६व्या मि.), वरूण कुमार (१९ व्या मि. व ३०व्या मि.) व मनदीप सिंग (४०व्या मि.) यांनी गोल करत भारताच्या विजयात योगदान दिले. पराभूत चीन संघाकडून वेनहुइ (१८व्या मि.) व जिएशेंग गाओ (२५व्या मि.) यांनी गोल केले. मात्र, भारताच्या बचाव फळीसमोर चीनचा निभाव लागला नाही.

हरमनप्रीत व वरूण यांच्या गोलमुळे भारताकडे मध्यंतरापर्यंत सहा गोलची आघाडी होती. त्यांनी पहिल्या दोन सत्रांत तीन-तीन गोल झळकावले. आकाशदीपचा मैदानी गोल वगळता भारताने सर्व गोल हे ‘पेनल्टी कॉर्नर’च्या साहाय्याने केले. चौथ्या सत्रात एकही गोल झाला नाही. भारताचा आता शुक्रवारी जपानशी सामना होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण कोरिया, मलेशियाचीही सरशी

आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या दक्षिण कोरियाने जपानवर २-१ असा विजय नोंदवला. कोरियाकडून पार्क चेओलेओन (२६व्या मि.) व जुंघो किम (३५व्या मि.) यांनी गोल नोंदवले. ओका रायोमाने (सहाव्या मि,) सुरुवातीला गोल करत जपानला आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी कायम राखण्यास जपानला अपयश आले. दिवसातील दुसऱ्या सामन्यात मलेशियाने पाकिस्तानला ३-१ अशा फरकाने पराभूत केले. मलेशियाकडून फिरहान अशारी (२८व्या व २९व्या मि.) व शेलो सिल्वेरियस (४४व्या मि.) यांनी गोल केले. पाकिस्तानचा एकमेव गोल अब्दुल रहमानने (५५व्या मि.) केला. संपूर्ण सामन्यावर मलेशियाचे वर्चस्व राहिले.