कोलकाता : भारतामध्ये प्रतिभावान बुद्धिबळपटूंची संख्या मोठी असली, तरी आपल्याला पुढील जगज्जेता मिळण्यासाठी २०२५ सालापर्यंतचा कालावधी लागेल, असे मत दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने व्यक्त केले.

‘‘तुम्ही जर विश्वविजेतेपदाच्या किताबाची चर्चा करत असाल, तर आपल्याला २०२५ सालापर्यंत पुढील जगज्जेता मिळू शकेल, त्यापूर्वी नाही. विश्वविजेतेपदापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही सोपा आणि वेगवान मार्ग उपलब्ध नाही. आपल्याला तयारीसाठी बराच वेळ मिळेल, पण बऱ्याच छोटय़ा-छोटय़ा गोष्टींचा बारकाईने विचार करावा लागेल,’’ असे आनंद म्हणाला.

विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने पुढील वर्षीच्या जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीतून माघार घेतल्याने ही लढत आता आव्हानवीर स्पर्धेतील विजेता ग्रँडमास्टर इयान नेपोम्निशी आणि उपविजेता ग्रँडमास्टर डिंग लिरेन यांच्यात होणार आहे. त्यामुळे डी. गुकेश, आर प्रज्ञानंद आणि अर्जुन इरिगेसी या युवा भारतीय बुद्धिबळपटूंना जगज्जेतेपदासाठी आव्हान देण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘पुढील एक-दोन वर्षांत कोणता खेळाडू कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यावरूनच आपल्याला पुढील विश्वविजेता कोण होऊ शकेल, याचा अंदाज येईल,’’ असेही आनंदने नमूद केले.