scorecardresearch

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर

भारताविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेने जाहीर केलेल्या १५ सदस्यीय संघातून ट्वेन्टी-२० कर्णधार दिनेश चंडिमल आणि लाहिरू थिरिमाने यांना वगळले आहे.

भारताविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेने जाहीर केलेल्या १५ सदस्यीय संघातून ट्वेन्टी-२० कर्णधार दिनेश चंडिमल आणि लाहिरू थिरिमाने यांना वगळले आहे. पूर्णपणे तंदुरुस्त नसलेल्या कुमार संगकारा याला संघात स्थान देण्यात आले आहे. संगकारा खेळू शकला नाही, तर निरोशान डिकवेला याला एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळू शकेल.
डावखुरा फिरकी गोलंदाज रंगना हेराथला विश्रांती देण्यात आली आहे, तर फिरकीपटू सूरज रणदीवचे पुनरागमन झाले आहे. याशिवाय लेग-स्पिनर सेक्युगे प्रसन्ना आणि डावखुरा फिरकी गोलंदाज चतुरंगा डी सिल्व्हा हे अन्य दोन फिरकीपटू संघात आहेत.
मध्यमगती गोलंदाज लाहिरू गमगेला प्रथमच श्रीलंकेच्या संघाचे दार उघडले आहे. न्यूवान कुलसेकरा आणि धम्मिका प्रसाद यांच्यासोबत तो नवा चेंडू हाताळू शकेल.
कटक, हैदराबाद, रांची, कोलकाता आणि अहमदाबाद येथे २ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पाच एकदिवसीय सामने होणार आहेत. त्याआधी श्रीलंकेचा संघ ३० ऑक्टोबरला मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर एक सराव सामना खेळणार आहे.
श्रीलंकेचा संघ : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुसल परेरा, तिलकरत्ने दिलशान, उपूल थरंगा, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, अशन प्रियंजन, निरोशान डिकवेला, थिसारा परेरा, न्यूवान कुलसेकरा, धम्मिका प्रसाद, लाहिरू गमगे, चतुरंगा डी सिल्व्हा, सेक्युगे प्रसन्ना आणि सूरज रणदीव.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandimal and thirimanne dropped from sri lankan odi squad