लिव्हरपूल आणि मँचेस्टर सिटीला मागे टाकून चेल्सीने इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली आहे. चेल्सीने स्टोक सिटीचा ३-० असा सहज पाडाव करत अग्रस्थानी झेप घेतली. मोहम्मद सालेह, फ्रँक लॅम्पार्ड आणि विलियन यांच्या गोलमुळे प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांच्या चेल्सी संघाला विजय मिळवताना फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. त्याआधी जुआन माटाच्या दोन गोल्सच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडने न्यूकॅसलचा ४-० असा पाडाव केला. जेवियर हेर्नाडेझ आणि अदनान जानुझाज यांनीही विजयात योगदान दिले.
दरम्यान, जायबंदी ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत गॅरेथ बॅलेने सुरेख कामगिरी करत रिअल माद्रिदला रिअल सोसिएदादवर ४-० असा दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयामुळे रिअल माद्रिदने ला लीगा फुटबॉल स्पर्धेच्या गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. अ‍ॅटलेटिको माद्रिदने व्हिलारिअलचे आव्हान १-० असे परतवून लावले. लिओनेल मेस्सीने केलेल्या दोन गोलांच्या बळावर बार्सिलोनाने रिअल बेटिसचा ३-१ असा पाडाव केला. तसेच बलाढय़ बायर्न म्युनिक संघाला बुंडेसलीगा (जर्मन फुटबॉल लीग) स्पर्धेत गेल्या १८ महिन्यांत पहिल्यांदाच लीगमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.