एपी, ईस्ट रुदरफोर्ड (अमेरिका)
कोल पाल्मरच्या दोन गोलच्या जोरावर चेल्सीने युरोपीय विजेत्या पॅरिस सेंट-जर्मेन संघावर अंतिम सामन्यात ३-० असा विजय मिळवत ‘फिफा’ क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्याला जोआओ पेड्रोने एक गोल करीत चांगली साथ दिली.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच चेल्सीने आक्रमक खेळ केला. २२व्या मिनिटाला चेल्सीला आघाडी घेण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून पाल्मरने गोल करीत संघाला १-० असे आघाडीवर नेले. यानंतर आठ मिनिटांनी पाल्मरने आणखी एक गोल करीत संघाची आघाडी २-० अशी भक्कम केली. यानंतर ४३व्या मिनिटाला पेड्रोने पाल्मरच्या पासवर पॅरिस सेंट-जर्मेनचा गोलरक्षक जियानलुइगी डोनारुम्माला चकवित गोल करीत संघाला ३-० अशा स्थितीत पोहोचवले. पेड्रोचा दोन जुलैनंतर चेल्सी संघासोबत आल्यानंतरचा हा तिसरा गोल ठरला. दोन वर्षांपूर्वी मँचेस्टर सिटीकडून चेल्सीसोबत आलेल्या पाल्मरने या हंगामात १८ गोल केले आहेत. पॅरिस सेंट-जर्मेन संघाने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेल्सीच्या भक्कम बचावफळीसमोर त्यांचा निभाव लागला नाही. त्यांना सामन्यातील अखेरची काही मिनिटे दहा खेळाडूंसह खेळावे लागले. कारण, सामन्याच्या ८४व्या मिनिटाला मार्क कुकुरेलाचे केस पकडून पाडल्याने जोआओ नेवेसला लाल कार्ड दाखविण्यात आले. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. या स्पर्धेपूर्वी पॅरिस सेंट-जर्मेन संघ चांगल्या लयीत होता. त्यांनी या सत्रात लीग-१, कूप डी फ्रान्स आणि आपले पहिले चॅम्पियन्स लीग जेतेपद मिळवले होते. ते हंगामात आपले चौथे जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, त्यांना यामध्ये अपयश आले. मेटलाइफ स्टेडियम येथे झालेला अंतिम सामना पाहण्यासाठी ८१,१८८ चाहत्यांची उपस्थिती होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंपही सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक देण्यात आला.
चेल्सी यापूर्वी प्रीमियर लीगमध्ये चौथ्या स्थानी राहिली होती आणि ‘युएफा’ कॉन्फरन्स लीगचे त्यांनी जेतेपद मिळवले होते. यापूर्वी, पॅरिस सेंट-जर्मेनला चॅम्पियन्स लीगच्या ऑक्टोबर २०२३च्या सामन्यात न्यूकॅसल संघाकडून ४-१ अशा तीन गोलच्या फरकाने पराभूत व्हावे लागले होते.
जेतेपदाची भावना ही वेगळी असते. सामना सुरू होण्यापूर्वी अनेकांना आमच्या कामगिरीवर शंका होती. मात्र, आम्ही आमचा खेळ करीत विजय नोंदवला. संघाने सर्वच आघाड्यांवर चांगली कामगिरी करताना पॅरिस सेंट-जर्मेनला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. – कोल पाल्मर