बुद्धिबळ अभ्यासक प्रा. बाळकृष्ण तांबे यांचे संशोधन; नव्या युद्धनीतीची जोड
चिन्मय पाटणकर, पुणे</strong>
भारतात उगम होऊन जगभरात लोकप्रिय झालेल्या ६४ घरांच्या बुद्धिबळाला आता आधुनिकतेचा स्पर्श झाला आहे. बुद्धिबळ अभ्यासक प्रा. बाळकृष्ण तांबे यांनी बुद्धिबळाच्या पटाला नव्या युद्धनीतीची जोड देत १०० घरांच्या आणि ४० मोहऱ्यांच्या आधुनिक बुद्धिबळाची निर्मिती केली आहे.
बुद्धिबळाच्या पटावर काल्पनिक पद्धतीने युद्ध खेळले जाते. सातव्या शतकात उगम झालेल्या या खेळाचे नियम काळानुरूप बदलण्यात आले. तर काही वर्षांपूर्वी संगणकामध्ये प्रोग्रॅमिंग करून बुद्धिबळपटू संगणकाविरुद्ध खेळू लागले. मात्र, मॅकेनिकल अभियंता असलेल्या प्रा. बाळकृष्ण तांबे यांच्या आधुनिक बुद्धिबळात ६४ घरांऐवजी १०० घरे, ३२ मोहऱ्यांऐवजी ४० मोहरे, मोहऱ्यांना नवी नावे, काही नवे नियम आहेत.
नव्या बुद्धिबळाची रचना, त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी ‘आधुनिक बुद्धिबळ १००’ ही पुस्तिका लिहिली आहे. या बुद्धिबळाचे बौद्धिक संपदा हक्क त्यांनी केंद्र सरकारकडे नोंदणीकृत केले आहेत.
‘पारंपरिक बुद्धिबळामध्ये असलेले सर्व संदर्भ मध्ययुगीन कालखंडातील आहेत.
पटावरील मोहऱ्यांना प्राण्यांची नावे असणे कालबाह्य़ झाले आहे. त्यामुळे ६४ घरांचा बुद्धिबळ पट जुनाट वाटत होता. आधुनिक काळानुसार त्यात बदल करण्याची गरज होती. त्यासाठी १०-१५ वर्षे संशोधन करून १०० घरांच्या आधुनिक बुद्धिबळ पटाची निर्मिती केली. सध्याच्या युद्धनीतीमध्ये वापरली जाणारी साधने मोहऱ्यांच्या रूपात समाविष्ट केली आहेत,’असे प्रा. तांबे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
१०० घरांच्या बुद्धिबळाचा संदर्भ
पं. त्रिग्वेंडाचार्य यांनी बुद्धिबळावर लिहिलेल्या ‘विलास मणि मंजरी’ या ग्रंथात पाश्चात्त्य, चिनी, दाक्षिणात्य बुद्धिबळाचा तौलनिक परामर्श घेतला आहे. त्यांच्या या ग्रंथात ‘मिश्र कर्नाटक महाविलास’ या १०० घरांच्या पटाचा उल्लेख आहे.
आधुनिक १०० घरांच्या बुद्धिबळाचा माझ्या स्तरावर वापर सुरू केला आहे. पण व्यापक स्तरावर पोहोचण्यासाठी त्याचा प्रचार, प्रसार होण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य, राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ संघटनांना माहिती देण्याचा, वापर करण्याबाबत प्रस्ताव देण्याचा विचार आहे.
– प्रा. बाळकृष्ण तांबे, बुद्धिबळ अभ्यासक