पीटीआय, सेंट लुइस (अमेरिका)

भारताचा जगज्जेता बुद्धिबळपटू दोम्माराजू गुकेशने सेंट लुइस अतिजलद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी निराशा केली. नऊ फेऱ्यांमध्ये एक विजय, चार पराभव आणि चार बरोबरी अशी कामगिरी करणाऱ्या गुकेशची एकूण गुणतालिकेत संयुक्तपणे सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. जलद प्रकाराच्या अखेरीस गुकेश चौथ्या स्थानी होती.

गुणतालिकेत अमेरिकेचा लेव्हॉन अरोनियन एकूण १९ गुणांसह अग्रस्थानावर असून फॅबियानो कारूआना त्याच्याहून दोन गुणांनी मागे आहे. फ्रान्सचा मॅक्सिम व्हॅचिएर-लाग्रेव्ह १६.५ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर नोदिरबेक अब्दुसत्तोरोव आणि वेस्ली सो (प्रत्येकी १५ गुण) संयुक्तपणे चौथ्या, तर गुकेश आणि व्हिएतनामचा लिएम ली कुआंग (प्रत्येकी १३ गुण) सहाव्या स्थानी आहेत. अमेरिकेचा लिनिएर डोमिंगेझ पेरेझ त्यांच्यापेक्षा दोन गुणांनी मागे आहे.

अतिजलद प्रकारात गुकेशने पेरेझविरुद्ध विजय मिळवला. मात्र, चार लढतींत त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. तिसऱ्या फेरीत वेस्ली सो, चौथ्या फेरीत अब्दुसत्तोरोव, सातव्या फेरीत लिएम ली आणि आठव्या फेरीत व्हॅचिएर-लाग्रेव्ह यांच्याकडून गुकेश पराभूत झाला. अतिजलद प्रकाराच्या नऊ फेऱ्या शिल्लक असून गुणतालिकेत वरचे स्थान मिळवायचे झाल्यास गुकेशला कामगिरीत मोठी सुधारणा करावी लागेल.