आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणारा मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडची आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली. या निवडीबद्दल त्याचे प्रशिक्षक मोहन शंकर जाधव यांच्यासह संपूर्ण स्टाफ आनंदी आहेत. जाधव यांनी ऋतुराजच्या अनेक आठवणी सांगितल्या. सख्या चुलत भावाच्या लग्नाला हजेरी लावून ऋतुराज क्रिकेटचा सराव करण्यासाठी आला होता एवढे त्याचे क्रिकेटवर प्रेम आहे. पाच वर्षात त्याने एकही सुट्टी घेतली नव्हती, असे असे जाधव यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितले.

प्रशिक्षक मोहन शंकर जाधव म्हणाले, ”ऋतुराज हा अत्यंत शांत स्वभावाचा आहे. तो १२व्या वर्षी वेंगसकर क्रिकेट अकादमीमध्ये दाखल झाला होता. त्याला क्रिकेटची प्रचंड आवड होती. १२ वर्षांपूर्वीच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल असे वाटले होते. क्रिकेटबद्दल ऋतुराज हा नेहमी आग्रही असायचा. पाच वर्षात एकही सुट्टी त्याने घेतली नव्हती. सख्या चुलत भावाच्या लग्नाला उपस्थिती लावून तो सराव करायला आला होता.”
हेही वाचा – करोनाग्रस्तांसाठी धावला युवराज सिंग..! ‘या’ राज्याला पुरवली वैद्यकीय सुविधा
जाधव म्हणाले, ”बॅटिंग करत असताना काही चुका आढळल्यास तो तात्काळ सुधारायचा. त्याच्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द पहिल्यापासून होती. कोणत्याही दबावात तो खेळू शकतो. टी-२० कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्यास ऋतुराज सक्षम आहे. विशेष करून गॅपमध्ये शॉट्स मारणारा प्लेअर अशी त्याची विशेष ओळख आहे.” जाधव यांनी ऋतुराजला जसा आहे तसा राहा आणि नेहमी प्रमाणे खेळत राहा, असा सल्ला दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात वेंगसकर क्रिकेट अकादमी असून २००८ला त्याची स्थापना करण्यात आली होती. क्रिकेटचे उत्तम धडे घेऊन चांगल्या खेळाडूंची निर्मिती करणे हे या अकादमीचे उद्धिष्ट होते. दरम्यान, ऋतुराजच्या निमित्ताने पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहराचे नाव आंतराष्ट्रीय स्तरावर घेतले जाणार आहे. ऋतुराज हा या शहरातील पहिला खेळाडू आहे, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे.