चीनच्या कुस्तीपटूंना आगामी आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतात प्रवेश देण्यात येईल, असे भारतीय कुस्ती संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. चीनमधील ‘करोना’ या विषाणूच्या संसर्गाच्या धोक्यामुळे तेथील नागरिकांना अन्य देशांत प्रवेश देण्यावरून निर्बंध घालण्यात येत आहेत. केंद्र सरकारनेही चीनच्या नागरिकांसाठीचा ई-व्हिसा रद्द केला आहे.

भारताच्या कुस्ती संघटनेकडून मात्र नवी दिल्ली येथे १८ ते २३ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी चीनच्या ४० कुस्तीपटूंच्या पथकाला प्रवेश मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानचे कुस्तीपटूही सहभागी होतील, असा विश्वास भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी व्यक्त केला. ‘‘मी परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्रमंत्र्यांनी मला त्या दृष्टीने आश्वासन दिले आहे,’’ असे ब्रिजभूषण म्हणाले.

‘‘चीनच्या कुस्ती संघटनेकडून आम्हाला पत्र पाठवण्यात आले आणि त्यांचा ४० जणांचा कुस्तीचा चमू येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या कुस्तीपटूंच्या चमूची ‘करोना’ चाचणी झाली असून त्यांना संसर्ग झालेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे,’’ अशी माहिती ब्रिजभूषण यांनी दिली.

जागतिक संघटनेकडून विचारणा : ‘युनायटेड वर्ल्ड रेसलिंग’ (यूडब्ल्यूडब्ल्यू) या जागतिक कुस्ती संघटनेकडून भारताच्या कुस्ती संघटनेला नुकतेच पत्र आले होते. त्यानुसार कोणत्याही देशातील खेळाडूंना प्रवेश निषिद्ध केल्यास भारताचे स्पर्धा आयोजनाचे यजमानपद रद्द होऊ शकते. ‘‘ऑलिम्पिकचे हे वर्ष आहे. त्यातच आशियाई स्पर्धेच्या पात्रता फेरीदेखील होणार आहेत. या स्थितीत जर आम्ही परदेशातील खेळाडूंना प्रवेश निषिद्ध केला तर आमच्या खेळाडूंचादेखील आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील सहभाग धोक्यात येऊ शकतो. आम्ही ही बाब परराष्ट्र मंत्रालयाकडे स्पष्ट केली आहे,’’ असे ब्रिजभूषण शरण सिंग यांनी स्पष्ट केले.