भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लवाद अधिकारी डी. के. जैन यांनी शुक्रवारी सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा हितसंबंधांसंदर्भातील प्रतिवाद फेटाळून लावला. याचप्रमाणे समालोचन, क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्यत्व किंवा इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) संघाचे मार्गदर्शन यापैकी एकाची निवड करण्याचे निर्देश दिले.
क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्यत्व भूषवणारे लक्ष्मण आणि गांगुली अनुक्रमे सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचे मार्गदर्शक होते. गांगुली हा बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपदसुद्धा सांभाळत आहे.
‘‘एक व्यक्ती, एक पद हे लोढा समितीच्या शिफारशींमध्ये नमूद करण्यात आले आहे. सचिन तेंडुलकरने क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्यत्व सोडल्यामुळे हितसंबंधांचा मुद्दा आड येत नाही. मात्र गांगुली आणि लक्ष्मण यांना आता आपले निर्णय घ्यावे लागणार आहेत,’’ असे डी. के. जैन यांनी सांगितले.