बर्मिगहॅम : हॉकी : भारतीय महिला हॉकी संघाचे राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने नियमित वेळेतील १-१ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ०-३ असा पराभव पत्करला, मात्र हा निकाल वादग्रस्त ठरला.

पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या रोसी मलोनने केलेला गोलचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला होता, मात्र गोलफलकावरील घडय़ाळ योग्य वेळी सुरू न झाल्याने पंचांनी मलोनला पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारताच्या प्रशिक्षिका जानेका स्कॉपमन यांनी पंचांशी चर्चाही केली, मात्र पंच आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने ऑस्ट्रेलियाला पेनल्टीची पुन्हा संधी मिळाली. मलोनने यावर गोल करत शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाचे खाते उघडले. त्यानंतर कॅटलिन नॉब्स आणि एमी लॉटन यांनीही गोल केले. दुसरीकडे भारताच्या लालरेम्सियामी, नेहा गोयल आणि नवनीत कौर या चेंडू गोलजाळय़ात मारण्यात अयशस्वी ठरल्याने ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.

तत्पूर्वी, नियमित वेळेत ऑस्ट्रेलियाकडून रेबेका ग्रेइनर (१०व्या मिनिटाला), तर भारताकडून वंदना कटारियाने (४९व्या मि.) गोल केले होते. आता रविवारी कांस्यपदकाच्या लढतीत भारतापुढे न्यूझीलंडचे आव्हान असेल.

‘एफआयएच’कडून माफी

शूटआऊटमध्ये घडय़ाळ वेळेवर सुरू न झाल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून (एफआयएच) माफी मागण्यात आली आहे. तसेच या घटनेचे पुनरावलोकन करून भविष्यात पुन्हा असा प्रकार घडणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही ‘एफआयएच’ने म्हटले आहे.