नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे वेळेचा अपव्यय असून, भारताने या स्पर्धावर कायमस्वरूपी बहिष्कार टाकावा, असा इशारा दिल्यामुळे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. परंतु केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि राष्ट्रकुल क्रीडा महासंघ यांनी यासंदर्भात भाष्य करण्याचे टाळले आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा दर्जा उच्चस्तरीय नसून, भारतीय खेळाडूंनी दर्जेदार स्पर्धामध्ये सहभागी होऊन देशाला पदके जिंकून द्यावी, असे मत बात्रा यांनी व्यक्त केले होते. नेमबाजी या क्रीडा प्रकाराला वगळल्याबद्दल याआधी बात्रा यांनी बर्मिगहॅमला होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात सध्या तरी सरकार कोणतेही मत प्रकट करणार नाही, असे क्रीडा मंत्रालयाकडून सांगण्यात आले, तर वादग्रस्त विषयावर प्रतिक्रिया देणार नसल्याचे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे प्रसारमाध्यम व्यवस्थापक टॉम डेगून यांनी सांगितले.

‘‘नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष डॅमे लॉसी मार्टिन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड ग्रेव्हेमबर्ग भारतीय ऑलिम्पिक संघटनेची भेट घेणार असून, यात बैठकीत नेमबाजीला वगळल्याप्रकरणी चर्चा होईल,’’ असे डेगून यांनी सांगितले.

कायमस्वरूपी बहिष्कार अस्वीकारार्ह आणि निराशाजनक!

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवरील कायमस्वरूपी बहिष्कार हा अस्वीकारार्ह आणि निराशाजनक असेल, अशा संतप्त प्रतिक्रिया देशातील क्रीडापटूंनी व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रकुलवरील बहिष्कार अस्वीकारार्ह आहे, असे मत भारताचा टेबल टेनिसपटू जी. साथीयानने व्यक्त केली. त्याने २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुलमध्ये कांस्यपदक जिंकले होते. राष्ट्रकुलवरील बहिष्कार हा निराशाजनक असून, खेळाडूंच्या मेहनतीची ही चेष्टा केली जात आहे, असे बॉक्सिंगपटू विजेंदर सिंगने म्हटले आहे.