Mohammad Rizwan Wicket: येत्या ९ सप्टेंबरपासून आशिया चषक २०२५ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर करण्यात आला आहे. पण संघातील सर्वात अनुभवी खेळाडू मोहम्मज रिझवानला या स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या संघातून डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे त्याने वेस्टइंडिजमध्ये जाऊन कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या स्पर्धेतही त्याचा फ्लॉप शो सुरूच आहे. बारबाडोस रॉयल्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात फलंदाजी करताना तो ज्या पद्धतीने बाद झाला, ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. त्याचा बाद होण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रिझवान बाद होताच समालोचकही हसू लागले
कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत सेंट किंट्स अँड नेविस पेट्रियट्स आणि बारबाडोस रॉयल्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात सेंट किंट्स अँड नेविस पेट्रियट्स संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. मोहम्मद रिझवान या स्पर्धेत सेंट किंट्स अँड नेविस पेट्रियट्स संघाकडून खेळत आहे. मात्र, या संघाकडून खेळताना त्याला आपली छाप सोडता आलेली नाही. ६ चेंडू खेळून तो अवघ्या ३ धावा करत तंबूत परतला. बाद होणं ठिक होतं, पण तो ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहून समालोचकांनाही हसू आवरलं नाही.
बारबाडोस रॉयल्स संघाकडून जोमेल वारिकन गोलंदाजी गोलंदाजी करत होता, त्यावेळी वारिकनने टाकलेल्या सरळ चेंडूवर रिझवानने स्विप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा अंदाच इतका चुकला की, चेंडू सरळ जाऊन यष्टीला धडकला. बाद झाल्यानंतर त्याला तोल सावरता आला नाही आणि तो खेळपट्टीवरच पडला. हे पाहून मैदानावर असणाऱ्या खेळाडूंसह, विरोधी संघातील खेळाडूंना आणि समालोचकांनाही हसू आवरलं नाही.
या सामन्यात सेंट किंट्स अँड नेविस पेट्रियट्स संघाने १२ धावांनी विजय मिळवला. सेंट किंट्स अँड नेविस पेट्रियट्स संघाने या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना २० षटकांअखेर ८ गडी बाद १७४ धावा केल्या. यादरम्यान काइल मेयर्सने २८ चेंडूंचा सामना करत ४२ धावांची दमदार खेळी केली. तर कर्णधार जेसन होल्डरने ३८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बारबाडोस रॉयल्स संघाचा डाव १६२ धावांवर आटोपला. यासह सेंट किंट्स अँड नेविस पेट्रियट्स संघाने हा सामना १२ धावांनी आपल्या नावावर केला.