India Pakistan Asia Cup Final Dew Effect: आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान रविवारी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या स्पर्धेतील गट फेरी आणि सुपर ४ मध्ये भारताने पाकिस्तानला दोन वेळा पराभूत केले आहे. अशात, अंतिम सामन्यातही भारत वरचढ ठरणार की पाकिस्तान पुनरागमन करणार, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. असे असले, तरी या सामन्याच्या निकालात दवही महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
कसे असणार दुबईचे हवामान?
हा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर होणार आहे. AccuWeather च्या मते, रविवारच्या हवामान अंदाजानुसार दुबईमध्ये दिवसा तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत चढणार असून, संध्याकाळी सुमारे ३२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल.
दव पडण्याची शक्यता
अशा तीव्र तापमानामुळे खेळाडूंना थकवा, मैदानाची गती कमी होणे आणि सर्वात महत्त्वाचे कदाचित संध्याकाळी उशिरा दव पडू शकते. दवाचा पातळ थरदेखील दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे अधिक कठीण करू शकतो. त्यामुळे या सामन्यात नाणेफेकही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
दुबईची खेळपट्टी कोणासाठी फायदेशीर?
दुबईची खेळपट्टी बऱ्याच काळापासून संयमी फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांसाठी साथ देणारी मानली जाते. सुरुवातीच्या षटकांमध्ये नवीन चेंडू स्विंग होऊ शकतो, म्हणजेच आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी संयमी फलंदाजी करणे गरजेचे ठरणार आहे. खेळ जसजसा पुढे जाईल, तसतशी खेळपट्टी फलंदाजीसाठी आणखी अनुकूल होण्याची शक्यता असते. त्यातच, दव पडू लागल्यास फिरकी गोलंदाजांसाठी चेंडूवर नियंत्रण ठेवणे कठीण होईल. ही परिस्थिती लक्षात घेता, नाणेफेक जिंकणारा संघ बहुधा दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे.
क्रिकेट सामन्यात दवाची भूमिका
क्रिकेट सामना जेव्हा रात्री खेळवला जातो, तेव्हा अनेकदा मैदानावर दव पडते. यामुळे चेंडू ओला होतो आणि तो पकडणे क्षेत्ररक्षकांसाठी, विशेषतः गोलंदाजांसाठी कठीण होते. तुम्ही अनेकदा क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांना जवळजवळ प्रत्येक चेंडूनंतर रूमालाने चेंडू सुकवताना पाहिले असेल. दवामुळे त्यांना हे करावे लागते.
ओल्या चेंडूमुळे गोलंदाजांची लाइन आणि लेंथ बिघडते. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केल्यास चेंडू फुल टॉस पडू शकतो किंवा जास्त उंचीवर गेल्यास नो-बॉल ठरू शकतो. तसेच, फिरकी गोलंदाज चेंडू अपेक्षेप्रमाणे स्पिन करू शकत नाहीत.