IND vs SL : नव्या दमाच्या टीम इंडियासमोर श्रीलंका बेचिराख!

पहिल्या वनडेत टीम इंडियाची श्रीलंकेवर ७ गड्यांनी सरशी

india wins first odi by seven wickets against sri lanka
पहिल्या वनडेत टीम इंडियाची श्रीलंकेवर सरशी

कोलंबोत रंगलेल्या पहिल्या वनडे सामन्यात नव्या दमाच्या टीम इंडियाने श्रीलंकेला ७ गड्यांनी धूळ चारत विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने नाबाद ८६ धावांची खेळी करत आपल्या नेतृत्वाची विजयी ‘गुढी’ उभारली. आर. प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार दासुन शनाका, चमिका करुणारत्ने यांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर लंकेने टीम इंडियासमोर ५० षटकात ९ बाद २६२ धावा केल्या. मात्र हे आव्हान टीम इंडियाने सहज पेलले.  युवा फलंदाज पृथ्वी शॉने ४३ तर पदार्पणवीर इशान किशनने ५९ धावा करत श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. आक्रमक सलामी देणाऱ्या पृथ्वीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारताचा डाव

श्रीलंकेच्या २६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी आक्रमक सुरुवात केली. पृथ्वीने आक्रमक पवित्रा धारण करत लंकेच्या गोलंदाजांना धू-धू-धूतले आहे. पहिल्या पाच षटकात टीम इंडियाने बिनबाद ५७ धावा केल्या. यात एकट्या पृथ्वीच्या नाबाद ४३ धावा होत्या. पृथ्वीला धनंजय डि सिल्वाने माघारी धाडत टीम इंडियाला पहिला धक्का दिला. पृथ्वीने २४ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत ९ चौकारांचा समावेश होता. पृथ्वीनंतर ‘बर्थडे बॉय’ आणि पदार्पणवीर इशान किशन मैदानात आला. त्याने ३३ चेंडूत अर्धशतक झळकावत लंकेच्या गोलंदाजांची हवाच काढून टाकली. किशनने ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला कर्णधार शिखर धवनने संयमी खेळी करत संघाला विजयाजवळ नेले. २५व्या षटकात शिखरने ५० धावा पूर्ण केल्या. सा सामन्यात त्याने वनडेत ६००० धावांचा टप्पाही ओलांडला. ३१व्या षटकात धनंजय डि सिल्वाने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या मनीष पांडेला बाद केले. ३१व्या षटकात शनाकाने मनीषचा झेल घेतला. मनीषने २६ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने नाबाद ३१ धावांचे योगदान दिले. त्याने ५ चौकार लगावले. नाबाद ८६ धावांची खेळी करणाऱ्या धवनने संदाकनच्या चेंडूवर एक धाव घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. धवनने ६ चौकार आणि एक षटकार ठोकला.

 

हेही वाचा – IND vs SL : भल्याभल्यांना मागे टाकत ‘गब्बर’नं रचला नवा इतिहास!

श्रीलंकेचा डाव

श्रीलंकेकडून मिनोद भानुका आणि अविष्का फर्नांडो यांनी फलंदाजीला सुरुवात केली. भारताकडून उपकर्णधार भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीची सलामी दिली. भानुका-फर्नांडो जोडीने पहिल्या गड्यासाठी ४९ धावांची भागीदारी केली. मागील काही सामन्यांपासून फॉर्म हरवलेल्या फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने आपल्या पहिल्याच षटकात मैदानावर स्थिरावलेल्या अविष्का फर्नांडोला बाद केले. मनीष पांडेने फर्नांडोचा झेल घेतला. त्याने ३२ धावा केल्या. त्यानंतर भारताचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने पदार्पणवीर भानुका राजपक्षाला त्यानंतर मिनोद भानुकाला बाद करत लंकेला संकटात टाकले. शतकाच्या आत सुरुवातीचे तीन गडी बाद झाल्यानंतर कर्णधार दासुन शनाका आणि चरिथा असालांकाने लंकेला स्थिरता दिली. असालांकाने ३८ तर शनाकाने ३९ धावांचे योगदा देत लंकेला दोनशे धावांच्या पार पोहोचवले. टीम इंडिया लंकेला अडीचशेच्या आत गुंडाळणार असे वाटत असताना चमिका करुणारत्नेने भुवनेश्वर कुमारवर हल्ला चढवला. त्याने भुवनेश्वरच्या शेवटच्या षटकात १९ धावा कुटत संघाला २६२ अशी धावसंख्या गाठून दिली. करुणारत्नेने २ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद ४३ धावा केल्या. भारताकडून दीपक चहर, कुलदीप यादव आणि यजुर्वेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cricket india wins first odi by seven wickets against sri lanka adn