संतोष सावंत

क्रिकेट खेळणाऱ्या सर्वच देशांचे प्रतिनिधी डॉक्टर गावस्कर यांच्या ‘टाइम मशीन’मध्ये उपस्थित होते. २०५१ मध्ये होणारी विश्वचषक स्पर्धा नेमकी कशी असेल? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची जबाबदारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांनी डॉक्टरांवर सोपवली होती. कालौघात विश्वचषक स्पर्धेचे अस्तित्व टिकेल का? क्रिकेटरसिकांचा प्रतिसाद कसा असेल? दर्जेदार क्रिकेट खेळणारे देश वाढतील का? क्रिकेट खेळाचे नियम किंवा स्वरूप यात काही बदल होतील का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी डॉक्टरांनी तयार केलेले ते ‘टाइम मशीन’ भविष्यात झेपावले होते.

शरीरातील अणू-रेणू गतीत विरघळून जात आहेत असा भास त्यानंतर काही सेकंदांसाठी सर्वाना झाला. मग एक जोरदार हादरा बसला आणि त्यानंतर पुन्हा सारे शांत झाले. समोरच्या स्क्रीनवर ‘@२०५१ विश्वचषक’ हे या मोहिमेचे नाव झळकले. त्यापाठोपाठ क्रिकेटचे एक भव्य मैदान दिसू लागले. मैदानातील अद्ययावत स्क्रीन्सवर आकर्षक जाहिराती दिसत होत्या. त्या पाहता एकूण १६ संघ या स्पर्धेत सहभागी झालेले दिसत होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांत अंतिम सामना सुरू होता. ड्रिंक्स ब्रेक झाला होता. स्टँड्स प्रेक्षकांनी भरलेले होते. ही उत्साहवर्धक दृश्ये पाहून सगळेच हरखून गेले.

डॉ. गावस्कर यांनी आनंदी स्वरात सुरुवात केली. ‘‘आपले सर्वाचे मन:पूर्वक अभिनंदन! आपण ३२ वर्षांचा प्रवास करून सुखरूप भविष्यात पोहोचलेलो आहोत. आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे येथे निश्चितच मिळणार आहेत; परंतु या सामन्याचा निकाल लागेपर्यंत मात्र आपल्याला येथे थांबता येणार नाही.’’ त्यांचे बोलणे ऐकून उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

‘‘उच्च दर्जाच्या कृत्रिम टर्फवर सामना खेळवण्यात येत होता. संपूर्ण मैदानावर पारदर्शक कवच असल्याने येथे पाऊस पडलाच तर पाण्याचा निचरा करण्याची वेळ येणार नव्हती. कारण तो पाऊस मैदानापर्यंत पोहोचणारच नव्हता. सामन्याचे समालोचन विविध भाषांमध्ये सुरू होते,’’ त्याचा सारांश डॉ. गावस्कर यांनी सांगायला सुरुवात केली.

‘‘विश्वचषक स्पर्धेचा हा अंतिम सामना आपण पाहात आहोत. या स्पर्धेतील सामने ४० षटकांचे आहेत. येथे प्रत्येक संघ दोन डाव खेळत आहेत. प्रत्येक डाव २० षटकांचा आहे आणि गंमत म्हणजे दुसऱ्या डावामध्ये कमाल चार खेळाडू बदलण्याची मुभा आहे. खेळाचा वेग आणि रोमहर्षकता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मैदानात पंचांची जागा यंत्रमानवांनी घेतली आहे,’’ डॉ. गावस्कर इतरांची प्रतिक्रिया अजमावण्यासाठी बोलायचे थांबले.

‘‘फलंदाजांच्या बॅटमध्ये चिप्स बसवलेल्या आहेत, तशाच त्यांच्या पॅड्समध्येही आहेत. चेंडूमध्येही ट्रॅकिंग चिप आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने पायचीत, झेलबाद किंवा धावबाद असा कोणताही निर्णय यंत्रमानव काही सेकंदांत अचूकपणे घेत आहेत. फलंदाज जर पायचीत असेल तर पॅड्सचा रंग बदलून लाल होतो आणि जर नसेल तर हिरवा,’’ असे डॉक्टर बोलत असतानाच मॅच सुरू झाली. सर्व जण मोठय़ा उत्सुकतेने समोर दिसणारे अद्भुत दृश्य डोळ्यांत साठवत होते.

पहिल्याच चेंडूवर यष्टिचीतचे जोरदार अपील करण्यात आले. यानंतर जे झाले ते धक्कादायक होते. यांत्रिक यष्टय़ा पाच सेकंदांत आपल्या जागी आपोआप उभ्या राहून त्यावर बेल्ससुद्धा आल्या. याचा अर्थ फलंदाज नाबाद होता. जर त्या पाच सेकंदांच्या आत यष्टय़ा उभ्या राहिल्या नसत्या तर फलंदाज बाद झाला असता. नंतरच्या चेंडूवर फलंदाजाने जोरदार प्रहार केला. चौकार की षटकार? असा प्रश्न सर्वाच्या मनात उभा राहिला; परंतु काही सेकंदांत संपूर्ण सीमारेषा निळ्या रंगाने उजळून निघाली. तो षटकार होता. चौकार असता तर ती पिवळ्या रंगाने उजळली असती. सामना पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकासमोर अद्ययावत स्क्रीन होता. थेट प्रक्षेपणासोबत रिप्लेसुद्धा पाहता येत होता. सारेच मंत्रमुग्ध होऊन भविष्यातील थरार अनुभवत होते.

‘‘भविष्यात खूप काही दडलेले आहे; परंतु आपल्याला आता अधिक काळ येथे थांबता येणार नाही,’’ असा डॉ. गावस्कर यांचा आवाज कानी पडला आणि सर्व जण भानावर आले. सर्वच जण थोडेसे नाराजही झाले; परंतु क्रिकेटचे भवितव्य उज्ज्वल आहे. याचा आनंद सर्वाच्याच चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.