विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतची मंगळवारी होणाऱ्या पहिल्या उपांत्य लढतीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे, तर गुरूवारी यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. राऊंड रॉबिन लीग पद्धतीनुसार झालेल्या ४५ सामन्याची साखळी फेरी शनिवारी ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामन्याने संपली. यातून गुणानुक्रमे भारत(१५ गुण), ऑस्ट्रेलिया (१४ गुण), इंग्लंड (१२ गुण) आणि न्यूझीलंड (११ गुण) यांनी अव्वल चार संघात स्थान मिळवले आहे. उपांत्य फेरीत पोहचलेल्या चारही संघाचा विश्वचषकचा इतिहास तपासल्यास अंतिम फेरीतील संघ कोणते असू शकतात याचा अंदाज बांधता येतो.
१९७५ पासून विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली, तेव्हापासून आजतागत क्रिकेट विश्वावर ऑस्ट्रेलिया संघाचे वर्चस्व दिसून येते. ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत ८ वेळा उपांत्य फेरीत पोहचला आहे. यापैकी सात वेळा या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाचवेळा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. तर दोन वेळा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. आता आठव्यांदा ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे. त्यांची लढत यजमान इंग्लंडशी होत आहे.
(आणखी वाचा : विराटपेक्षा रो’हिट’, फक्त सहा पावले दूर )
क्रिकेटचे जन्मजाते म्हणून इंग्लंडला ओळखले जाते. मात्र, इंग्लंड संघाला आतापर्यंत एकदाही विश्वचषकावर नाव कोरता आलेले नाही हे विशेष. इंग्लंड संघाने आतापर्यंत सहा वेळा उपांत्य फेरीत मजल मारली आहे. मात्र, एकदाही विश्वचषक उंचावता आलेला नाही. तीन वेळा इंग्लंड संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. यंदाच्या विश्वचषकात मॉर्गनच्या नेतृत्वातील इंग्लंडचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
(आणखी वाचा : विराट-विल्यमसनबद्दलचा ११ वर्षांनंतर जुळून आला हा योगायोग, निकालही तोच लागणार?)
न्यूझीलंड संघाने विश्वचषक स्पर्धेत नेहमीच आपली छाप सोडली आहे. मात्र, इंग्लंड संघाप्रमाणे न्यूझीलंड संघाला आतापर्यंत एकदाही विश्वचषक उंचावता आलेला नाही. न्यूझीलंड संघाने आठव्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यंदाच्या विश्वचषकात न्यूझीलंडची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. चांगल्या सुरूवातीनंतर अडखळत न्यूझीलंडने उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंड संघाला आतापर्यंत फक्त एकदा अंतिम सामन्यात धडक मारता आली आहे. न्यूझीलंडचा सामना विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासोबत होत आहे.
(आणखी वाचा : युवराजच्या मार्गदर्शनामुळे विश्वचषकात सातत्याने धावा करू शकलो – रोहित शर्मा)
भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. सांघिक कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. विश्वचषकाच्या इतिहासावर नजर टाकल्यास उपांत्य फेरी गाठण्याची भारताची ही सातवी वेळ आहे. भारतीय संघाने दोन वेळा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. तर एक वेळा भारतीय संघ उपविजेता राहिला आहे. तीन वेळा भारतीय संघाला उपांत्य फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ कशी कामगिरी पाहतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

वरील फोटमधील आकडेवारी पाहिल्यास अंतिम फेरीत कोणते दोन संघ पोहचू शकतात याचा अंदाज तूम्ही बांधू शकता. क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ असला तरीही विश्वचषकातील आकडे सर्वकाही बोलून जातात. त्यामुळे २००३ प्रमाणे पुन्हा एकदा भारत आणि ऑस्टेलिया यांच्यात अंतिम लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते, हेही विसरता कामा नये. ११ जुलै रोजी कोणत्या दोन संघात विश्वचषकाचा सामना रंगणार हे निश्चित होईल.
