Cristiano Ronaldo: इंग्लिश प्रीमियर लीग क्लब मँचेस्टर युनायटेडने करार रद्द केल्यानंतर स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आता सौदी अरेबियाच्या क्लब अल नासरसोबत खेळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. स्पॅनिश वृत्तपत्र मार्काच्या वृत्तानुसार, पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डोने अल नासरसोबत अडीच वर्षांचा करार करण्यास सहमती दर्शवली असल्याचेही समजत आहे. अहवालानुसार, ३७ वर्षीय रोनाल्डोला अल नसर येथे एका हंगामासाठी १,७२८ कोटी रुपये (२०० दशलक्ष युरो) मिळतील इथपर्यंत चर्चा सुरु होत्या पण आता स्वतः रोनाल्डोने या चर्चांवर उत्तर दिलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रोनाल्डोचे नाव हे खेळापेक्षा भांडणांमुळेच जास्त चर्चेत आले होते. मँचेस्टर युनायटेडचे मॅनेजर एरिक टेन हॅग यांच्यासह रोनाल्डोचे भांडण झाल्यावरच त्याला संघातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समजत होते मात्र आता फिफा विश्वचषकाच्या दरम्यान रोनाल्डो आणि युनायटेडने वेगळे होणार असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे. रोनाल्डोचा संघ सध्या फिफा विश्वचषकातील १६च्या फेरीत पोहोचला असून त्यांचा सामना स्वित्झर्लंडशी होणार आहे. हा सामना कतारच्या लुसेल स्टेडियमवर होणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, मागील आठवड्यापासून रोनाल्डो नवीन फुटबॉल क्लबच्या शोधात होता. रोनाल्डोला अल नासरची ऑफर गेल्या आठवड्यातच आली होती. मात्र, विश्वचषकादरम्यान ग्रुप स्टेजवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने त्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्रा आता, रोनाल्डोने अल नासरशी करार केल्याचे नाकारले आहे. या अफवांबद्दल स्पष्ट माहिती देताना रोनाल्डोने या बातम्या खोट्या असल्याचे म्हंटले आहे.
रोनाल्डो सौदी अरेबियामधून खेळणार का?
हे ही वाचा<< विश्लेषण: पोर्तुगाल संघातून ख्रिस्तियानो रोनाल्डोला का वगळले? रोनाल्डोच्या कारकीर्दीची ही अखेर समजावी का?
दरम्यान, रोनाल्डोने २०२१ मध्ये इटालियन क्लब युव्हेंटस सोडून मँचेस्टर युनायटेडसाठी करार केला. तेव्हापासून त्याने मँचेस्टर युनाइटेडसाठी एकूण २४ गोल केले आहेत. रोनाल्डोने प्रीमियर लीगमध्ये १८ गोल केले होते. रोनाल्डोचा वर्षातील प्रीमियर लीग संघातही समावेश होता. मॅन यू येथे असताना रोनाल्डोने सर मॅट बसबे प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार देखील जिंकला होता.