Georgina Rodriguez Engagement Ring: जगातील प्रसिद्ध फूटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने अखेर त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ११ ऑगस्ट रोजी रोनाल्डोने लग्नासाठी मागणी घातल्याची बातमी जॉर्जिनाने दिली. सुमारे एक दशकापासून एकमेकांबरोबर असणारे हे जोडपे अखेर लग्नबंधनात अडकण्यासाठी आता तयार झाले आहेत. जॉर्जिनाने आपल्या बोटात हिऱ्याची अंगठी घातल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोनंतर रोनाल्डोच्या चाहत्यांमध्ये या अंगठीची चर्चा आहे. अतिशय सुंदर अशा या अंगठीची किंमत किती असेल? यावर सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
पोर्तुगालचा असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगभरातील फूटबॉल चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. त्याचा वेगवान खेळ, लीग स्पर्धेतील त्याची कामगिरी आणि फिटनेसप्रती त्याची असलेली शिस्तप्रिय जीवनशैली अनेकांना प्रेरित करते. तसेच सर्वाधिक श्रीमंत असलेल्या क्रीडापटूमध्येही त्याचा समावेश होतो.
ख्रिस्तियानो रोनाल्डोने गर्लफ्रेंड जॉर्जिनाला दिलेली अंगठी अतिशय महाग असल्याची चर्चा होत आहे. दरम्यान हिऱ्यांची पारख असलेल्य तज्ज्ञांच्या मतानुसार या अंगठीची किंमत ही एमएस धोनीच्या २०२५ च्या आयपीएल वेतनापेक्षाही दहा पट अधिक असू शकते.
पेज सिक्स स्टाईलने दिलेल्या माहितीनुसार, दागिन्यांमधील दोन जाणकारांनी या अंगठीची किंमत २ दशलक्ष ते ५ दशलक्ष डॉलर्सच्या आसपास असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय रुपयांमध्ये याची किंमत १७.५ कोटी ते ४३.८ कोटी रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. लॉरेल डायमंड्समधील साखरपुड्याच्या अंगठ्याच्या तज्ज्ञ लॉरा टेलर यांनी सांगितले की, जॉर्जिनाच्या अंगठीतील हिऱ्याचा खडा दोन दशलक्ष डॉलरच्या किमतीचा असू शकतो.
टेलर पुढे म्हणाल्या, ही एक आकर्षक अशी अंगठी आहे. हिऱ्याला अंडाकृती कट दिल्यामुळे त्याची चमक वाढली आहे. हिऱ्याला जे पैलू पाडले आहेत, त्या प्रत्येक पैलूतून त्याचे चमकदार रूप दिसते. फूटबॉल क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय जोडप्यासाठी ही अंगठी अतिशय शोभून दिसत आहे.
एमएस धोनीचे वेतन किती?
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी हा यंदा अनकॅप्ड खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये खेळला. ४ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळल्याला खेळाडूला आयपीएलच्या नियमानुसार अनकॅप्ड ठरवले जाते. त्यामुळे अनकॅप्ड कोट्यात धोनीला संघाकडून ४ कोटी रुपये मिळाल्याचे सांगितले जाते.
ख्रिस्तियानो रोनाल्डोने गर्लफ्रेंड जॉर्जिनाला दिलेली अंगठी ५ दशलक्ष डॉलर किंमतीची (४३.८ कोटी रुपये) असेल तर ती धोनीच्या आयपीएल २०२५ च्या पगारापेक्षा १० पट असू शकते, असा अंदाज बांधण्यात येत आहे.