पीटीआय, लंडन
भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान सुरू असलेल्या पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये वापरल्या गेलेल्या ‘ड्यूक्स’ चेंडूंवर टीका झाल्यानंतर उत्पादक कंपनीने चेंडूंची सखोल तपासणी करण्याची तयारी दर्शविली आहे.
सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत पार पडलेल्या तीनही सामन्यात वापरण्यात आलेले ड्यूक्स चेंडू सातत्याने नरम पडत होते. चेंडूचा कडकपणा अजिबात टिकून राहत नव्हता. त्यामुळे अनेकदा पंचांना चेंडू बदलावा लागला. साधारण तीस षटकांनंतरच चेंडू खराब होत होते. या सगळ्याचा परिणाम रोजचा खेळ लांबण्यावर झाला होता.
इंग्लंड गोलंदाजांनीही या चेंडूविषयी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यांनी थेट टीका करून चेंडू खराब असल्याचे म्हटले होते. या टीकेनंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ वापरलेले चेंडू शक्य तेवढे गोळा करून उत्पादक कंपनीकडे परत करणार आहे. ‘‘आम्ही हे सर्व चेंडू सामन्यातून काढून घेऊ. त्यांची सर्वांगीण तपासणी करू,’’ असे ड्यूक्स कंपनीचे मालक दिलीप जाजोदिया यांनी सांगितले.
‘‘कसोटी मालिकेसाठी वापरले जाणारे चेंडू यजमान मंडळ निश्चित करते. आम्ही या चेंडूंचे पुनरावलोकन करू. आम्हाला काही बदल करावेसे वाटल्यास ते करू. कडक करावे लागले, तर ते देखील करू,’’ असेही जाजोदिया म्हणाले. इंग्लंडमधील मालिकेत ड्यूक्स चेंडू वापरला जातो. भारतातील मालिका ‘एसजी’ चेंडूने खेळविल्या जातात. तर ऑस्ट्रेलियात ‘कुकाबुरा’ चेंडूला पसंती असते.
इंग्लंडमध्ये ड्यूक्स कंपनी १७६० पासून चेंडूची निर्मिती करत आहे. अलीकडच्या काळात कसोटीसह अगदी कौंटी क्रिकेटमध्येही त्यांना अशाच प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. लॉर्ड्स कसोटीत दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात पहिल्या तासातच दुसरा नवा चेंडू बदलावा लागला. या बदललेल्या चेंडूवर कर्णधार गिल समाधानी नव्हता. नव्या चेंडूवर बूमराने तीन गडी बाद केले होते. पण, चेंडू बदलल्यानंतर भारताला फलंदाजाला बाद करण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली होती.