पीटीआय, मियामी : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने एफटीएक्स क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धेतील विजयी घोडदौड सुरू ठेवताना गुरुवारी तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या हान्स निमनवर २.५-१.५ अशा फरकाने सरशी साधली. प्रज्ञानंदचा हा सलग तिसरा विजय ठरला.

१७ वर्षीय प्रज्ञानंदने पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये अनुक्रमे अलिरझा फिरौझा आणि अनिश गिरी या आघाडीच्या खेळाडूंना पराभूत केले होते. त्यामुळे तीन फेऱ्यांअंती नऊ गुणांसह प्रज्ञानंद गुणतालिकेत संयुक्तरीत्या अग्रस्थानी आहे. त्याचे आणि जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनचे समान गुण आहेत. कार्लसनने तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या अनुभवी लेव्हॉन अरोनियनचा २.५-१.५ असा पराभव केला.

निमनविरुद्धच्या लढतीत प्रज्ञानंदला सुरुवातीला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. त्याने या लढतीचा पहिला डाव गमावला. मात्र, त्यानंतर दमदार पुनरागमन करताना प्रज्ञानंदने दुसऱ्या आणि चौथ्या डावामध्ये विजयाची नोंद केली, तर तिसरा डाव बरोबरीत सोडवला. त्यामुळे त्याला तीन गुण कमावण्यात यश आले.

तिसऱ्या फेरीच्या अन्य लढतींत, कनिष्ठ गटातील अव्वल बुद्धिबळपटू फिरौझाने गिरीवर टायब्रेकरमध्ये ४-३ अशी मात केली. चीनच्या क्वँग लिएम लीने पोलंडच्या यान-क्रिस्टोफ डुडाला २.५-१.५ अशा फरकाने नमवले.