विजयासाठी दावेदार समजल्या जाणाऱ्या भारताने डेव्हिस चषक स्पर्धेतील आशिया/ओशियाना गटातील तैवानविरुद्धच्या लढतीत शानदार सुरुवात केली. युकी भांबरीने दुखापतीनंतरही जिद्दीने खेळ करत विजय मिळवून भारताला आघाडी मिळवून दिली. सोमदेव देववर्मनचा सामना अंधूक प्रकाशामुळे रद्द करण्यात आला.
पहिले दोन सेट आरामात जिंकल्यानंतर युकी तिसऱ्या सेटवरही नाव कोरून सहज विजय मिळवणार, असे चित्र दिसत होते. पण तिसऱ्या सेटच्या नवव्या गेममध्ये युकीच्या दोन्ही पायांचे स्नायू ताणले गेले. अशा परिस्थितीतही झुंज देत युकीने तैवानच्या संग हुआ यँग याचे आव्हान ६-२, ६-४, ६-७ (१), ६-३ असे मोडीत काढत भारताला पहिला विजय मिळवून दिला. युकीने पहिल्या दोन सेटवर वर्चस्व गाजवले. त्याने यँगला प्रतिकार करण्याची कोणतीही संधी दिली नाही. दुखापतीने डोके वर काढल्यामुळे युकीला सव्‍‌र्हिस करण्यात तसेच कोर्टवर धावतानाही अडचण येत होती. पण याचा फायदा यँगला उठवता आला नाही. युकीला सामन्यातून माघार घेण्याची संधी वँगने वाया घालवली. युकीने चौथा सेट जिंकत भारताला आघाडीवर आणले.
दुसऱ्या एकेरीच्या लढतीत सोमदेवला मात्र टी चेन याच्या कडव्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले. तब्बल साडेचार तास रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत सोमदेवने ६-७ (४), ७-६ (३), १-६, ६-२, ७-७ अशी बरोबरी साधली आहे. अंधूक प्रकाशामुळे दुसरी लढत रद्द करण्यात आली असून हा सामना शनिवारी दुहेरीच्या लढतीआधी खेळवण्यात येईल. चेनने नेटवर अप्रतिम खेळ करत ड्रॉप-शॉट्सचे सुरेख फटके लगावत सोमदेवला निष्प्रभ केले. पहिल्या दोन्ही सेटचा निकाल टायब्रेकरद्वारे लागला. पहिला आणि तिसरा सेट गमावल्यानंतर दुसरा आणि चौथा सेट जिंकून सोमदेवने बरोबरी साधली. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये चार मॅचपॉइंट वाचवत सोमदेवने आपले आव्हान कायम राखले आहे. पण सोमदेववर वर्चस्व गाजवल्यामुळे हा सामना जिंकण्याच्या चेन याच्या आशा उंचावल्या आहेत. दरम्यान, रोहन बोपण्णा-साकेत मायनेनी जोडीचा दुहेरीचा सामना शनिवारी सिएन-यिन पेंग आणि सिन-हॅन ली यांच्याशी होणार आहे.