बांगा बीट्सचा प्रमुख खेळाडू पारुपल्ली कश्यप याने विजयासह खाते उघडले तरी पुढील तिन्ही सामने जिंकून क्रिश दिल्ली स्मॅशर्सने बांगा बीट्सवर ३-१ अशी विजयी आघाडी घेतली.
पारुपल्ली कश्यपने सुरुवातीपासूनच दिल्लीच्या बी. साईप्रणीथवर वर्चस्व गाजवले. त्यामुळे कश्यपने हा सामना २१-१५, २१-११ असा सहज जिंकून बांगा बीट्सला आघाडीवर आणले. कश्यपने दमदार स्मॅशेस लगावत पहिल्या गेममध्ये १८-९ अशी भक्कम आघाडी घेतली होती. पहिला गेम जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्येही कश्यप ९-४ अशा आघाडीवर होता. त्याने ती पुढे १७-१० अशी वाढवली. अखेर दुसरा गेमही जिंकून कश्यपने सहज विजयाची नोंद केली.
महिला एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीच्या निचाओन जिंदापोन हिने बांगा बीट्सच्या कॅरोलिना मारिन हिच्यावर २१-१७, १५-१, ११-९ अशी मात केली. या विजयासह दिल्लीने १-१ अशी बरोबरी साधली. पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या सामन्यात बून होएंग टॅन-किएन किएट कू जोडीने बांगा बीट्सच्या कार्स्टन मोगेन्सन-अक्षय देवलकर यांचा २१-११, २०-२१, ११-७ असा पराभव करून दिल्लीला २-१ असे आघाडीवर आणले. चौथ्या सामन्यात एच. एस प्रणयने बांगा बीट्सच्या अरविंद भटवर २१-१८, ७-२१, ११-८ अशी मात करत दिल्लीला विजय मिळवून दिला.