भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने चीनचा दिग्गज खेळाडू लिन डॅनवर मात करत डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतला आपल्याच देशाच्या समीर वर्माचा सामना करायचा आहे. पहिला सेट गमावल्यानंतर श्रीकांतने जोरदार पुनरागमन करत १८-२१, २१-१७, २१-१६ च्या फरकाने सामना जिंकत डॅनला पराभवाचा धक्का दिला.

अवश्य वाचा – Denmark Open Badminton – सायना नेहवालची अकाने यामागुचीवर मात; उपांत्यपूर्व फेरीत धडक

पाचवेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद आणि दोन ऑलिम्पिक पदकांचा अनुभव गाठीशी असलेला लिन डॅन हा बॅडमिंटनमधला सर्वात अनुभवी खेळाडू मानला जातो. सध्या लिन डॅन हा जागतिक क्रमवारीत श्रीकांतच्या मागे असला तरीही त्याचा अनुभव हा दांडगा आहे. याआधी २०१६ साली झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत लिन डॅनने किदम्बी श्रीकांतला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का दिला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे समीर वर्माने २०१८ च्या आशियाई खेळांचा सुवर्णपदक विजेता इंडोनेशियन खेळाडू जोनाथन ख्रिस्तीवर मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिलांमध्ये सायना नेहवालनेही अकाने यामागुचीवर मात करत आगेकूच केली आहे. आता सायनापुढे जपानच्याच नोझुमी ओकुहाराचं आव्हान असणार आहे. दुसरीकडे भारताची महिला दुहेरी जोडी आश्विनी पोनाप्पा आणि एन. सिकी रेड्डीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या जोडीसमोर जपानच्या अव्वल मानांकित युकी फुकूशिमा आणि सायाका हिरोटाचं आव्हान असणार आहे.

अवश्य वाचा – Denmark Open 2018 : अश्विनी पोनप्पा-सिक्की रेड्डी जोडी उपांत्यपूर्व फेरीत