भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वगुणांवर सध्या टीका होत असली तरी पाकिस्तानचा माजी कर्णधार वासिम अक्रम याने मात्र धोनीची पाठराखण केली आहे. धोनी हाच कर्णधारपदासाठी योग्य आहे. मात्र सामन्यादरम्यान रणनीती आखताना त्याचे धोरण लवचिक असायला हवे, असेही अक्रमने सांगितले.
 ‘‘कठीण परिस्थितीचा सामना करताना भारतीय संघ आणि धोनीकडे योग्य डावपेचांचा अभाव जाणवतो. धोनीवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी वेगवेगळे कर्णधार असायला हवेत असे संघ व्यवस्थापनाला वाटत असल्यास, धोनीकडून कर्णधारपद हिरावून घेण्यास काहीच हरकत नाही. धोनीचा वारसदार म्हणून युवा फलंदाज विराट कोहलीकडे पाहिले जात आहे. पण भारतासारख्या संघाचे नेतृत्व सांभाळण्यासाठी कोहलीचा अनुभव फारच कमी आहे,’’ असे अक्रम म्हणाला.