एका संघाचा कर्णधार प्रतिस्पर्धी संघाला ‘चीअर अप’ करताना कधी कोणत्या खेळात तुम्ही पाहिलंय?.. प्रतिस्पर्धी संघाने जास्त धावा कराव्यात, जास्त बळी मिळवावेत आणि सामना जिंकावा यासाठी समोरच्या संघातील कर्णधार कधी उत्साहपूर्ण वातावरणात तुम्हाला दिसलाय?.. नाही ना! पण ५ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मुंबई इंडियन्सचे निळे टी-शर्ट आणि ध्वज घेऊन त्यांची पाठराखण करताना दिसला तर गोंधळून जाऊ नका.. हे अविश्वसनीय वाटतंय ना?.. तसा कोणाचाही विश्वास बसणार नाही, नीट पाहा.. पण मैदानातील धोनीकडे नाही, तर स्टेडियममधील धोनीकडे. कारण या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सला प्रोत्साहन देणार आहे तो धोनीसारखा हुबेहूब दिसणारा पक्का मुंबईकर उमेश कांबळे.
उमेश हा धोनीसारखाच दिसतो, त्याच्यासारखाच आवाजही काढतो आणि त्यामुळेच त्याला २००८ साली ‘महालॅक्टो’ या चॉकलेटच्या जाहिरातीमध्ये धोनीबरोबर काम करायची संधी मिळाली होती.
‘‘मी ऑगस्ट क्रांती मैदानात क्रिकेट खेळतो. २००७मध्ये धोनी भारतीय संघात आला तेव्हा त्याच्यासारखेच माझे केस लांब होते. याचप्रमाणे मी यष्टीरक्षण आणि त्याच्यासारखी तुफानी फलंदाजीही करतो. त्यामुळे मी मैदानात असताना मला ‘धोनी-धोनी’ अशा आरोळ्या ठोकत क्रिकेटरसिक प्रोत्साहित करायचे. ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकल्यावर तर माझी भारतीय संघाच्या गणवेशात मिरवणूक काढण्यात आली होती,’’ असे उमेशने सांगितले.
धोनीला दोनदा भेटण्याची संधी उमेशला मिळाली. याबद्दल उमेश म्हणाला की, ‘‘महालॅक्टो’च्या जाहिरातीप्रसंगी धोनी त्याचे काम संपवून बसला होता. त्याला कुणीतरी सांगितले की, तुझ्यासारखा हुबेहूब दिसणारा एक तरुण आलाय. त्यावेळी धोनी मला बघायला आला आणि मला बघताच क्षणी त्याला आश्चर्याचा धक्का बसला. टक लावत तो माझ्याकडे पाहतच राहिला. त्यानंतर एकदा वानखेडेवर त्याला भेटायला गेलो तर तिथे मला एस. श्रीशांत भेटला. मला बघून तो म्हणाला ‘थांब, धोनीला सांगून येतो, त्याचा जुळा भाऊ आलाय’. त्यावेळीही माझी धोनीची भेट झाली.’’
तू ‘प्रतिधोनी’, पण मुंबईत राहणारा. त्यामुळे ५ तारखेच्या सामन्यात कोणाला ‘चीअर अप’ करणार? असं विचारल्यावर उमेश म्हणाला, ‘‘मी धोनीसारखाच दिसत असलो तरी मी मुंबईत लहानाचा मोठा झालोय, अस्सल मुंबईकर आहे, त्यामुळे मी शंभर टक्के मुंबईच्याच बाजूने असेन!’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhoni will cheer up to mumbai indians
First published on: 04-05-2013 at 01:31 IST