Rishabh Pant Injury: लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस इंग्लंडच्या फलंदाजांनी गाजवला. इंग्लंडकडून पहिल्या दिवशी जो रूट आणि ऑली पोप यांनी शतकी भागीदारी केली. त्यानंतर रूट आणि स्टोक्सने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाची धावसंख्या २५० पार पोहोचवली. रूट ९९ धावांवर नाबाद माघारी परतला. तर स्टोक्सही अर्धशतकाच्या जवळ पोहोचला होता. पहिल्या दिवशी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. उपकर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं. त्याच्या जागी ध्रुव जुरेल यष्टीरक्षण करण्यासाठी मैदानात आला.

या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये ऋषभ पंतच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे ऋषभ पंतने या सामन्यातही फलंदाजी करणं हे भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं आहे. मात्र पहिल्याच दिवशी यष्टिरक्षण करताना जसप्रीत बुमराहचा चेंडू ऋषभ पंतच्या तर्जनीला जाऊन लागला. आधी त्याने दुखणं सहन करून काही वेळ यष्टिरक्षण केलं. पण त्यानंतर त्याला मैदान सोडावं लागलं.

पंत मैदानाबाहेर गेल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी ध्रुव जुरेल यष्टिरक्षणाची जबाबदारी पार पाडायला मैदानात आला. त्याने ३० व्या षटकापासून ते शेवटपर्यंत यष्टिरक्षण केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही तो यष्टिरक्षणासाठी मैदानात उतरला आहे. पंतच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने अधिकृत माहिती दिली आहे. त्याच्या डाव्या तर्जनीला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

ऋषभ पंत फलंदाजीला येणार का?

पंत मैदानावर परतणार की नाही? हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे त्याच्या जागी ध्रुव जुरेलला फलंदाजी करण्याची संधी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर याचं उत्तर आहे, नाही. ध्रुव जुरेल हा ऋषभ पंतचा बदली खेळाडू म्हणून मैदानावर आला आहे. त्यामुळे तो फलंदाजी करू शकत नाही. आयसीसीच्या नियमानुसार जर एखादा खेळाडू कन्कशनमुळे बाहेर झाला असेल तर त्याच्या जागी येणारा खेळाडू हा फलंदाजी करण्यासाठी पात्र असतो. ऋषभ पंतच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे ध्रुव जुरेल हा त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून मैदानात आला आहे. त्यामुळे एकतर ऋषभ पंतला मैदानात यावं लागेल किंवा मग भारतीय संघाला १० फलंदाजांसह फलंदाजी करावी लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.