पीटीआय, स्टॉकहोम : ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने प्रतिष्ठेच्या डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये गुरुवारी ८९.९४ मीटर अंतरासह स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत दुसरे स्थान मिळवले. मात्र, तारांकित खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत त्याला ९० मीटरचा टप्पा गाठण्यात थोडक्यात अपयश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२४ वर्षीय नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८९.९४ मीटर अंतर पार करत आपला ८९.३० मीटर अंतराचा राष्ट्रीय विक्रम मोडला. हा विक्रम त्याने पावो नुर्मी क्रीडा स्पर्धेदरम्यान प्रस्थापित केला होता. ९० मीटर अंतरापर्यंत पोहोचण्यापासून तो अवघे सहा सेंटीमीटर दूर राहिला. अखेर तीच नीरजची सर्वोत्तम कामगिरी ठरली आणि त्याला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. नीरजने आपल्या इतर प्रयत्नांत ८४.३७ मीटर, ८७.४६ मीटर, ८४.७७ मीटर, ८६.६७ मीटर आणि ८६.८४ मीटर अंतरावर भाला फेकला.

जागतिक विजेत्या आणि हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ९०.३१ मीटर अंतर भाला फेकत अग्रस्थान मिळवले. जर्मनीचा जुलिआन वेबर ८९.०८ मीटर अंतरासह तिसरा आला. तर, टोक्यो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जाकुब वाद्लेचला (८८.५९ मीटर) चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.

नीरजने या महिन्यात दोनदा अँडरसनहून सरस कामगिरी केली. टुर्कू येथे झालेल्या स्पर्धेत ग्रेनाडाचा खेळाडू तिसरा स्थानी होता, तर कुओर्टेन क्रीडा स्पर्धेत नीरजने ८६.६९ मीटर अंतरासह सुवर्ण कामगिरी केली.

पाहा व्हिडीओ –

नीरजने पहिल्याच प्रयत्नात चमक दाखवत डायमंड लीग स्पर्धेचे जेतेपद मिळवणारा पहिला भारतीय बनू शकला असता. मात्र, अव्वल तिघांमध्ये स्थान मिळवणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी, थाळीफेकपटू विकास गौडाने दुसरे स्थान मिळवले होते. २०१४ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या गौडाने या स्पर्धेत आपल्या कारकीर्दीत चार वेळा अव्वल तीन खेळाडूंमध्ये स्थान पटकावले होते.

नीरजने चार वर्षांत पहिल्यांदाच डायमंड लीगमध्ये सहभाग नोंदवला होता. यापूर्वी, तो २०१७ मध्ये तीन व २०१८ मध्ये चार स्पर्धेत सहभागी झाला होता. युजिन (अमेरिका) येथे १५ ते २४ जुलै दरम्यान होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी नीरजसाठी ही महत्त्वाची स्पर्धा होती.

पहिल्या प्रयत्नात ९० मीटर अंतर पार करेन असे मला वाटले होते. पण, तसे झाले नाही. परंतु आगामी स्पर्धामध्ये हे अंतर पार करण्याचा माझा प्रयत्न राहील. यावेळी अव्वल ठरता आले नसले, तरीही सर्वोत्तम कामगिरी केल्याने मी आनंदी आहे.

– नीरज चोप्रा, भालाफेकपटू 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diamond league athletics neeraj chopra second place breaking own national record distance ysh
First published on: 02-07-2022 at 00:02 IST