महेंद्रसिंह धोनीनंतर भारतीय संघाची सुत्र ही विराट कोहलीकडे आली. तरुण वयात भारतीय संघाची कमान सांभाळणाऱ्या विराट कोहलीनेही आपल्या कामगिरीने सगळ्यांना दखल घ्यायला लावली. मैदानात कोहली जितका त्याच्या खेळीमुळे लोकांच्या लक्षात राहतो तितकाच, मैदानाबाहेर तो त्याच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे लक्षात राहतो. विराट कोहलीच्या प्रत्येक स्टाईलला तरुणाईतून खूप मोठा प्रतिसाद मिळतो. सध्या विराट कोहली मैदानात वापरत असलेली बॅट ही चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.
‘क्रिकविझ’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनूसार विराट कोहली वापरत असलेल्या बॅटची किंमत ही तब्बल २० हजार रुपयांच्या घरात जाते. विराट कोहली सध्या MRF कंपनीची ‘अ’ श्रेणीतली इंग्लिश लाकडापासून तयार केलेली बॅट वापरतो. वेबसाईटने दिलेल्या माहितीनूसार विराटच्या बॅटवरील पृष्ठभागावरील तयार करण्यात आलेल्या खास रेषांमुळे या बॅटची किंमत २० हजारांच्या घरात गेली आहे. बॅडची कडा लागून अनेकदा चेंडू स्लिपमध्ये उभ्या असलेल्या खेळाडूच्या हाती जातो. हे टाळण्यासाठीच विराटने आपल्या बॅटच्या पृष्ठभागावर या रेषा तयार करुन घेतल्या आहेत.
क्रिकेटव्यतिरीक्त विराट सध्या जाहीरातींमध्येही बराचसा व्यस्त असतो. सध्या बाजारात विराटला महेंद्रसिंह धोनीपेक्षा जास्त मागणी असल्याचं समोर येतंय. विराट वापरत असलेल्या बॅटसाठी MRF कंपनीने त्याला तब्बल ८ कोटी रुपये मोजले आहेत. जुन २०१७ पर्यंत विराट कोहलीचं बाजारातलं जाहीरात मुल्य हे १२ कोटींपेक्षाही जास्त असल्याचं कळतंय.
अवश्य वाचा – भारतीय खेळाडूंना त्रास द्यायला मला मजा येते – स्मिथ