दिलीप वेंगसरकर : भारताचे माजी कर्णधार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईच्या क्रिकेटचा इतिहास इतका मोठा आहे की, ज्याची जगातील कोणत्याही राज्याशी तुलना होऊ शकत नाही. मुंबईने ४१ वेळा रणजी विजेतेपदाला गवसणी घातली आहे. यातूनच त्याचे मोठेपण सिद्ध होते. याशिवाय भारतीय संघाला सर्वाधिक कसोटीपटू हे मुंबईने दिले आहेत. त्यामुळे मुंबई हे क्रिकेटचे माहेरघर आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मला मुंबईकडून खेळायला मिळाले, याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजतो. मी मुंबईचे प्रतिनिधित्व केले, तसेच नेतृत्वही केले. मुंबईकडून खेळायला मिळाल्यामुळे खूप मोठा नावलौकिक मिळाला. मुंबईने जे आम्हा क्रिकेटपटूंना दिले, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. १८व्या वर्षी मी मुंबई संघात स्थान मिळवले. त्या वेळी मुंबईच्या संघात मातब्बर कसोटीपटूंचा समावेश होता. त्यांच्यासोबत रेल्वेने प्रवास करताना, ड्रेसिंग रूममध्ये किंवा सामने पाहताना बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. एक प्रकारे क्रिकेटचे उत्तम संस्कारच आमच्यावर झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हे आयुष्यभर क्रिकेटपटूला उपयोगी पडतात. आताच्या मुंबई क्रिकेटपटूंनीही यशाची परंपरा जोपासली आहे. शाळा आणि महाविद्यालयीन क्रिकेटसुद्धा इथले अधिक सामर्थ्यशाली आहे. त्यामुळे खेळाडू तावूनसुलाखून निघतो. त्यामुळे समोरचा संघ कितीही बलवान असला आणि हा खेळाडू प्रथमच जरी खेळत असला तरी त्याचे दडपण येत नाही. मुंबईच्या क्रिकेटपटूवर मानसिक दडपण नसते.

मुंबईच्या क्लब क्रिकेटची संस्कृती अतिशय समृद्ध आहे. याशिवाय कार्यालयीन क्रिकेट स्पर्धासुद्धा इथे होतात. काही दशकांपूर्वी कसोटी क्रिकेटपटू क्लब आणि कार्यालयीन क्रिकेट सामने खेळायचा. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हंगाम बारमाही चालू असल्यामुळे त्यांना हे सामने खेळायला वेळ मिळत नाही. त्यामुळे मुंबईतील उदयोन्मुख क्रिकेटपटूची प्रगती ही वेगाने होत नाही. क्लब क्रिकेटचा ढाचा आधी जितका खंबीर होता, आता तो तितका राहिलेला नाही. तेव्हा क्रिकेटमध्ये पैसा नव्हता. रणजी करंडकाच्या एका सामन्याचे मानधन हे शंभर रुपये होते. त्यामुळे नोकरीद्वारे मिळणारा पगार हेच सर्वस्व होते. अगदी टाइम्स शिल्डमध्ये कामगिरी चांगली झाली तरी पगारवाढ किंवा पदोन्नती मिळायची. मुंबईच्या क्रिकेटशी ऋणानुबंधाने नाते सांगणाऱ्या अनेक आठवणी या प्रसंगी रुंजी घालत आहेत. अनेक क्षण या वेळी डोळ्यांसमोर उभे राहतात. अगदी १९९१ मध्ये हरयाणाविरुद्धचा रणजी करंडकाचा अंतिम सामना दोन धावांनी गमावल्याची आठवण असो किंवा याप्रमाणे असंख्य. त्या सामन्यात आम्हाला ३६५ धावा करायच्या होत्या; परंतु ३ बाद ३० अशी अवस्था झाली तरी आम्ही हार न मानता अखेपर्यंत लढा दिला. अजून एक आठवणसुद्धा हरयाणाविरुद्धच्या सामन्याचीच आहे. जी खेळपट्टी सामन्याला देणार असे अपेक्षित होते, ती बदलून प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशी आखाडा खेळपट्टी देण्यात आली. तिथे ४ बाद १८ अशी पंचाईत झाली होती; परंतु आम्ही १८० धावसंख्येपर्यंत मजल मारली. मी आणि करसन घावरीने जिगरीने धावा काढल्या. मग पॅडी शिवलकरच्या गोलंदाजीने कमाल दाखवली. समोर पराभव दिसत असेल, तरी हार मानायची नाही, ही मुंबईच्या क्रिकेटची संस्कृती. शेवटपर्यंत ती झुंज आणि जिद्द मुंबईचा खेळाडू दाखवतो. त्यामुळेच मुंबईचा क्रिकेटपटू खडूस आहे, असे कौतुकाने म्हटले जाते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip vengsarkar view on mumbai 500th ranji game
First published on: 08-11-2017 at 05:50 IST