स्थानिक क्रिकेटमधील दमदार कामगिरीच्या जोरावर दिनेश कार्तिकने भारतीय एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थान मिळवले. वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याला फलंदाजीच्या जोरावर मैदानात उतरण्याची संधी मिळाली. त्यानंतर आता तो कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. कार्तिकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात नाबाद ५० धावांची तर टी २० सामन्यात ४८ धावांची खेळी केली होती. वेस्ट इंडिज दौऱ्यावर लक्षवेधी खेळी केल्यानंतर त्याला आता कसोटी संघात स्थान मिळवण्याचे वेध लागले आहेत. एकदिवसीय आणि टी-२० मध्ये स्थान मिळाल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत कार्तिक म्हणाला की, आंतरराष्ट्रीय आणि टी-२० सामन्यात स्थान मिळवल्यानंतर आता मी कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी उत्सुक आहे. पुन्हा एकदा पांढरी जर्सी घालून मैदानात उतरण्याचे माझे स्वप्न आहे. पांढऱ्या पोशाखात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळायचे आहे. मी मधल्या फळीची जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळू शकतो, असा विश्वास देखील त्याने व्यक्त केला.
दिनेश कार्तिकने बांगलादेशविरुद्ध २०१० मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला आहे. तो पुढे म्हणाला की, एकदिवसीय संघात मिळालेली संधी माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. देशासाठी मैदानात उतरुन धावा करण्यात आनंद मिळतो. संधीचे सोने करुन २०१९ च्या विश्वचषकात खेळण्याचा मानस देखील त्याने यावेळी व्यक्त केला.
यावेळी त्याला एकदिवसीय संघात फलंदाज म्हणून स्थान मिळाल्यानंतर यष्टीरक्षक सोडून फलंदाजीवर लक्ष देण्यावर अधिक भर देणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला की, मी दोन्ही कौशल्य असणारा खेळाडू आहे. त्यामुळे फलंदाजी म्हणून माझी निवड झाली असली तरी यष्टीरक्षकाची जबाबदारी पेलण्याची किंवा त्याकडे दुर्लक्ष करणार नसल्याचे सांगत कोणत्याही ठिकाणी उत्तम क्षेत्ररक्षण करु शकतो, असेही त्याने सांगितले.