अन्वय सावंत, लोकसत्ता

मुंबई : जागतिक सांघिक अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद, ऑलिम्पियाडमध्ये पुरुष व महिला संघांचे सुवर्णयश, महिलांमध्ये जू वेन्जून जगज्जेती आणि त्यापाठोपाठ पुरुषांमध्ये डिंग लिरेनला जगज्जेतेपद. गेल्या काही वर्षांतील या यशामुळे जागतिक बुद्धिबळातील चीनची प्रगती आणि वर्चस्व अधोरेखित होत आहे.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या डिंग लिरेनने रशियाच्या इयन नेपोम्नियाशीला नमवत जगज्जेतेपदाचा मान मिळवला. जगज्जेतेपद मिळवणारा लिरेन हा एकूण १७ वा आणि चीनचा पहिला बुद्धिबळपटू ठरला. मात्र, या अलौकिक यशासाठी लिरेनला २५ दिवस, १४ पारंपरिक डाव आणि ‘टायब्रेकर’चे चार डाव संघर्ष करावा लागला.

गेले दशकभर जगज्जेतेपद राखणाऱ्या मॅग्नस कार्लसनने यंदाच्या जागतिक लढतीतून माघार घेतल्यामुळे लिरेन आणि नेपोम्नियाशी यांना संधी निर्माण झाली. या दोनही खेळाडूंनी जागतिक लढतीत हार न मानण्याची वृत्तीचे दर्शन घडवले. त्यामुळे १४ पारंपरिक डावांअंती लढतीत ७-७ अशी बरोबरी होती. यानंतर ‘टायब्रेकर’मधील तीन डाव बरोबरीत सुटले. परंतु चौथ्या डावात कमी वेळ शिल्लक असतानाही लिरेनने आक्रमक चाली रचत विजय संपादला.

या लढतीच्या सुरुवातीला लिरेनला वेळेवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत होते. चाली रचण्यासाठी वेळ कमी असल्याने त्याच्याकडून चुका झाल्या. मात्र, या चुकांमधून तो शिकला आणि ‘टायब्रेकर’मध्ये हीच शिकवण त्याच्या कामी आली.

लिरेनने या लढतीचा दुसरा डाव निराशाजनक पद्धतीने गमावला होता. परंतु या पराभवाचा फार विचार न करता, तो पुढील डावात त्याच जोमाने खेळला. त्याने तिसरा डाव बरोबरीत सोडवला आणि चौथ्या डावात विजय मिळवला. यानंतरच्या तीनपैकी दोन डावांमध्ये नेपोम्नियाशीने बाजी मारल्यामुळे लिरेनवर पुन्हा दडपण होते. पुढील चार डाव बरोबरीत सुटल्याने नेपोम्नियाशी जेतेपदाच्या अगदी जवळ पोहोचला. परंतु १२ व्या डावात लिरेनने बाजी उलटवली. नेपोम्नियाशीने केलेल्या चुकीचा फायदा घेत लिरेनने विजय मिळवला आणि लढतीत बरोबरी साधली. मग अखेरचे दोन डाव बरोबरीत सुटल्याने लढतीचा निकाल ‘टायब्रेकर’मध्ये गेला आणि यात दडपणाखाली खेळ उंचावत लिरेनने विजय नोंदवला.

‘‘गेल्या जागतिक लढतीत मॅग्नस कार्लसनने आघाडी घेतल्यानंतर नेपोम्नियाशीला पुनरागमन करता आले नव्हते. त्यापूर्वी १९९५च्या लढतीत गॅरी कास्पारोव्हविरुद्ध डाव गमावल्यानंतर युवा विश्वनाथन आनंदलाही दडपणाखाली पुनरागमन करण्यात अपयश आले होते. परंतु कारकीर्दीतील पहिली जागतिक लढत खेळणाऱ्या लिरेनने हार मानली नाही. पराभवानंतर फार निराश न होता, पुढील डावात तो तितक्याच ताकदीने खेळला. हेच त्याच्या यशाचे गमक होते,’’ असे ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे म्हणाले.

नेपोम्नियाशीच्या गाठीशी अधिक अनुभव होता. तो गेल्या जागतिक लढतीत कार्लसनविरुद्ध खेळला होता. तसेच विविध पद्धतींचे अधिक ज्ञान त्याला होते. मात्र, त्यापेक्षाही लिरेनची जिंकण्याची जिद्द वरचढ ठरली.

लिरेनचे यश खास, पण नशिबाचीही साथ!

लिरेन गुणवान खेळाडू असून त्याने जगज्जेतेपद मिळवताना केलेली कामगिरी खास आहे. मात्र, त्याला नशिबाचीही साथ लाभली, असे मत द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक रघुनंदन गोखले यांनी व्यक्त केले. ‘‘लिरेनला नशिबाची साथ लाभली असे म्हणायला हरकत नाही. लिरेन मानसिकदृष्टय़ा अधिक कणखर होता; पण त्याने चुकाही केल्या. नेपोम्नियाशीला अनेकदा पटावरील भक्कम स्थितीचा फायदा घेता आला नाही. त्याच्या जागी अन्य एखादा तांत्रिकदृष्टय़ा सक्षम खेळाडू असता, तर त्याने विजय मिळवला असता. मात्र, ही लढत रंजक झाली आणि दोन्ही खेळाडूंनी दाखवलेल्या जिद्दीचे कौतुक झाले पाहिजे,’’ असे गोखले म्हणाले. ‘‘लिरेन आव्हानवीरांच्या (कँडिडेट्स) स्पर्धेसाठीही पात्र ठरला नसता. परंतु जागतिक बुद्धिबळ संघटनेने सर्गे कार्याकिनवर कारवाई केली आणि सर्वोत्तम गुणांकन असलेल्या खेळाडूला या स्पर्धेसाठी निवडण्याचा निर्णय झाला. लिरेन करोनाकाळात सामनेच खेळला नव्हता. त्यानंतर चीन बुद्धिबळ संघटनेने दोन-तीन स्पर्धाचे आयोजन केले आणि लिरेनने या स्पर्धातील कामगिरीच्या आधारे गुणांकन वाढवले. त्यामुळे तो आव्हानवीरांच्या स्पर्धेसाठी पात्र ठरला. या स्पर्धेत त्याला दुसरे स्थान मिळाले होते. मात्र, कार्लसनने जागतिक लढतीतून माघार घेतल्याने लिरेनला नेपोम्नियाशीविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने केले,’’ असे गोखले यांनी नमूद केले.