भारताचा थाळीफेकपटू विकास गौडा याने बुधवारी निवृत्तीची घोषणा केली. १५ वर्षाच्या कारकिर्दीनंतर वयाच्या ३४व्या वर्षी विकासने निवृत्तीचा निर्णय घेतला. विकासने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. भारतातर्फे राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये पुरुष गटात सुवर्णपदक जिंकणारा विकास हा एकमेव खेळाडू आहे. विकासने चार वेळा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.

गेल्या वर्षी भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये विकासने कांस्य पदक पटकावले होते. त्यानंतर वर्षभरात विकासने कोणत्याही बड्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीचा निर्णय हा अपेक्षित होता.

विकासने अथेलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (AFI) यांना आपण निवृत्त स्वीकारत असल्याचे पात्र पाठवले. त्यानंतर AFIने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. ‘भारताचा थाळीफेकपटू, ऑलिम्पियन, राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा २०१४ मध्ये सुवर्णपदक पटकावणारा विकास गौडा याने निवृत्ती स्वीकारली आहे. भारतीय अॅथेलेटिक्समधील योगदानाबाबत आणि भारताला नव्या उंचीवर नेल्याबद्दल तुझे आभार. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! असे ट्विट AFIने केले आहे.