Divya Deshmukh Won Chess World Cup: भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने इतिहासाला गवसणी घातली आहे. दिव्याने एफआयडीई विश्वचषक स्पर्धेतील अंतिम फेरीत ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीचा पराभव करत विश्वविजेतेपद जिंकलं आहे. १९ वर्षीय दिव्या देशमुख टायब्रेकरमध्ये गेलेल्या सामन्यात उत्कृष्ट चाली चालत कोनेरू हम्पीला हार मानायला भाग पाडलं आणि विजय मिळवला.
जॉर्जियाच्या बटुमी येथे झालेल्या एफआयडीई महिला विश्वचषक स्पर्धेत, भारताच्या दोन्ही लेकी एकमेकांविरूद्ध खेळत होत्या. दिव्या देशमुखने अनुभवी कोनेरू हम्पीला टायब्रेकमध्ये पराभूत करून शानदार विजय मिळवला. या विजयामुळे दिव्या देशमुख भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर बनण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे गेली आहे. ही स्पर्धा तब्बल २४ दिवस चालली आणि अंतिम फेरीत दिव्याने अत्यंत संयम, कौशल्य आणि आत्मविश्वास दाखवून या ऐतिहासिक कामगिरीची मानकरी ठरली आहे.
१९ वर्षीय दिव्या देशमुख ठरली वर्ल्ड चॅम्पियन
यासह दिव्या देशमुखे बुद्धिबळ विश्वचषकाचे जेतेपद पटकावणारी पहिली महिला भारतीय बुद्धिबळपटू ठरली आहे. १९ वर्षीय दिव्या ही तिची प्रतिस्पर्धी असलेल्या अनुभवी हम्पीच्या निम्मया वयाची होती. कोनेरू हम्पी ही ग्रँडमास्टर बनणारी भारताची पहिली महिला आहे. हम्पी ग्रँडमास्टर झाल्यापासून, फक्त दोन महिलांनीच ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आहे. आजच्या वर्ल्डकप अंतिम फेरीतील विजयासह दिव्या दिग्गजांच्या मांदियाळीत आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली.
सोमवारी, पहिला गेम अनिर्णित राहिल्यानंतर, हम्पीच्या चुकीमुळे दिव्याने दुसरा टायब्रेक गेम जिंकला. हम्पी आणि दिव्या यांच्यातील पहिले दोन्ही क्लासिकल गेम अनिर्णित राहिले. शनिवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या गेममध्ये दिव्याला कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यातील पहिल्या दोन क्लासिकल डावांचा निकाल बरोबरीत लागला होता. शनिवारी झालेल्या पहिल्या डावात दिव्या पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळत होती आणि तिच्याकडे सामना जिंकण्याची चांगली संधी होती. तिने चांगली रणनीती आखली होती आणि पटावर स्पष्ट आघाडी घेतली होती. मात्र शेवटी, तिने काही चुकीच्या चाली खेळल्या आणि त्यामुळे हम्पीला सामना पुन्हा बरोबरीवर आणण्याची संधी मिळाली.
कोनेरू हम्पीवर मात करत विश्वविजेतेपद पटकावताच दिव्याला अश्रू अनावर झाले. त्यानंतर दिव्या तिच्या आईला बिलगून ढसाढसा रडताना दिसली. जगभरातून दिव्याचं कौतुक केलं जात आहे.