नोव्हाक जोकोव्हिचची झोकात सुरुवात; कर्बर, क्विटोव्हाची आगेकूच

जागतिक क्रमवारीत असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने वर्षांतील शेवटच्या ग्रॅण्ड स्लॅम अर्थात अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. मनगटाच्या दुखापतीने त्रस्त जोकोव्हिचला या सामन्यात हाताच्या दुखापतीनेही सतावले. मात्र दुखापतींना टक्कर देत त्याने सरशी साधली. दुखापतींनी खचून न जाता पुनरागमन करणाऱ्या राफेल नदालनेही विजयासह दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. महिलांमध्ये अँजेलिक कर्बर, पेट्रा क्विटोव्हा, कॅरोलिन वोझ्नियाकी यांनी दुसरी फेरी गाठली.

वर्षांतील तिसरे ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद पटकावण्यासाठी आतुर जोकोव्हिचने पोलंडच्या जेर्झी जॅन्कोविझवर ६-३, ५-७, ६-२, ६-१ असा विजय मिळवला. शंभर टक्के तंदुरुस्त नसल्याचे जोकोव्हिचने स्पर्धेच्या पूर्वसंध्येला स्पष्ट केले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत सलामीच्या लढतीत अनपेक्षित पराभवानंतर जोकोव्हिचचा हा पहिलाच सामना होता. लौकिकाला साजेसा खेळ करीत जोकोव्हिचने आश्वासक सुरुवात केली. मात्र पहिल्याच सेटमध्ये उजव्या हाताला दुखापत झाल्याने त्याला उपचार घ्यावे लागले. याचा परिणाम होऊन जोकोव्हिचने दुसरा सेट गमावला. विम्बल्डन स्पर्धेत जोकोव्हिचला तिसऱ्या फेरीतून गाशा गुंडाळावा लागला होता. मात्र जॅन्कोविझला कोणतीही संधी न देता जोकोव्हिचने पुढच्या दोन्ही सेटसह सामना जिंकला. ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने खेळणे कठीण आहे. दुखापतीने सतावले मात्र त्यावर मात करण्यात मी यशस्वी ठरलो,’ असे जोकोव्हिचने सांगितले. दुसऱ्या फेरीत जोकोव्हिचचा मुकाबला जिरी वेस्लीशी होणार आहे. गेल्यावर्षी माँटे कार्लो स्पर्धेत जिरीने जोकोव्हिचला नमवण्याची किमया केली होती.

२०१० आणि २०१३ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या नदालने उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टोमिनवर ६-१, ६-४, ६-२ अशी मात केली. लाल मातीचा बादशहा असणाऱ्या राफेल नदालला दुखापतीमुळे फ्रेंच तसेच विम्बल्डन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. ऑलिम्पिक स्पर्धेत मात्र नदालने दोन सुवर्णपदकांसह दिमाखदार पुनरामगन केले. कॅनडाच्या मिलास राओनिकने डस्टिन ब्राऊनचा ७-५, ६-४, ६-४ असा पराभव केला. मारिन चिलीचने रोजिरो डट्रा सिल्व्हाला ६-४, ७-५, ६-१ असे नमवले. गेइल मॉनफिल्सने गाइल्स म्युलरवर ६-४, ६-२, ७-६ अशी मात केली.

कायले एडय़ुमंडने १३व्या मानांकित रिचडॅ गॅस्क्वेटवर ६-२, ६-२, ६-३ अशी मात करत सनसनाटी विजयाची नोंद केली.

महिलांमध्ये बेलिंडा बेनकिकने समंथा क्रॉफर्डवर ६-७ (६-८), ६-३, ६-४ असा विजय मिळवला. पेट्रा क्विटोव्हाने जेलेना ओस्टापेन्कोचा ७-५, ६-३ असा पराभव केला.

जोहाना कोन्टाने बेथानी मॅथेक सॅण्ड्सवर ६-३, ६-३ अशी मात केली. कॅरोलिन वोझ्नियाकीने टेलर टाऊनसेण्डला ४-६, ६-३, ६-४ असा विजय मिळवला. गार्बिन म्युग्युरुझाने एलिस मर्टेन्सचा २-६, ६-०, ६-३ असा पराभव केला. सैसाई झेंगने मोनिका प्युगला ६-४, ६-२ नमवले.