ऋषभ पंतची खराब कामगिरी हा भारतीय संघातला सध्याच सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने धोनीला संघाबाहेर करत, ऋषभ पंतला संघात जागा दिली. मात्र यानंतर मिळालेल्या संधींमध्ये ऋषभ आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यामुळेच कसोटी मालिकेत भारतीय संघ व्यवस्थापनाने पंतला विश्रांती देत साहाला संधी देण्याचं ठरवलं. मध्यंतरीच्या काळात सोशल मीडियावर पंतला विश्रांती देत धोनीला पुन्हा संघात स्थान देण्याची मागणी होत होती. मात्र पंतची धोनी आणि साहाशी तुलना करणं योग्य नसल्याचं मत, भारताचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी व्यक्त केलं आहे.

अवश्य वाचा – हार्दिकची जागा घेण्यासाठी नाही, देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यावर भर – शिवम दुबे

“वृद्धीमान साहा सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे यात काही वादच नाही, पण पंत हा त्यानंतरचा चांगला यष्टीरक्षक आहे. त्याच्या कामगिरीत सुधारणा होते आहे. जर तुमची फलंदाजी खराब असेल तर तुम्ही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या देशांमध्ये शतक झळकावूच शकत नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हा त्याचा पहिलाच दौरा होता हे देखील आपल्याला विसरुन चालणार नाही. माझ्या मते त्याला आणखी थोडा वेळ द्यायला हवा. त्याची साहा आणि धोनीशी तुलना करणं योग्य ठरणार नाही.” किरण मोरे Mid Day वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या, ऋषभ पंत किरण मोरेंकडून प्रशिक्षण घेत आहेत. मात्र त्याच्यासोबत नेट्समध्ये फारसा वेळ घालवता आला नसल्याचंही मोरेंनी यावेळी स्पष्ट केलं. “मी आणि ऋषभ फोनवरुन एकमेकांशी संपर्कात असतो, मात्र मला त्याच्यासोबत आठवडाभराचा कालावधी हवा असल्याचं मी प्रशिक्षक रवी शास्त्रींना सांगितलं आहे”, किरण मोरे ऋषभच्या फॉर्मबद्दल बोलत होते. सलग दोन मालिकांमध्ये खराब कामगिरी केल्यानंतरही ऋषभला विंडीजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं आहे. त्यामुळे या मालिकेत त्याची कामगिरी कशी होते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – ICC Test Ranking – मोहम्मद शमीचा ‘TOP 10’ गोलंदाजांमध्ये समावेश