डॉ. प्रकाश परांजपे

बिनहुकमी डावांत उतारी ज्या पंथाची असेल त्या पंथाचं मोठय़ात मोठं पान जो खेळाडू खेळतो, तो त्या दस्ताचा विजेता होतो. उतारीच्या पंथाचं पान नसेल तो खेळाडू दुसऱ्या कुठल्याही पंथाचं पान खेळू शकतो, मात्र ते पान भारी असलं तरीही हात जिंकण्यासाठी त्याचा काहीच उपयोग होत नाही. समजा उत्तरेची उतारी किलवर दश्शीची आहे आणि पूर्व-दक्षिण किलवरची छोटी पानं – चव्वी आणि दुरी खेळले, -आणि पश्चिमेच्या खेळाडूकडे किलवर पंथाचं पान नाही, म्हणून त्याने इस्पिकचा बादशहा दिला. बादशहा दश्शीपेक्षा भारी असला तरी उतारी किलवरची होती, त्यामुळे किलवर पंथाचं भारीत भारी पान खेळणारा खेळाडू तो दस्त जिंकेल. म्हणजेच तो दस्त उत्तर जिंकेल, पश्चिम नव्हे. यामुळे उतारी केलेल्या पंथाचं पान नसताना दस्ताकरिता खेळलेल्या इतर पंथाच्या पानाला ‘पान जाळणे’ अशी संज्ञा वापरली जाते. या दस्तात पश्चिमेने किलवर उतारीवर इस्पिकचा बादशहा जाळला असं म्हटलं जातं.

हुकमी डावांत मात्र या नियमाला एक दरबारी अपवाद असतो. उतारीच्या पंथाचं पान नसेल तर खेळाडूला हुकमाचं पान खेळून ‘मारती’ घेता येते. अशा दस्तामध्ये जो खेळाडू हुकमाचं सगळ्यात भारी पान खेळतो, तो त्या दस्ताचा विजेता होतो. मात्र उतारीच्या पंथाचं पान असेल तर ते खेळावंच लागतं. पान असून खेळलं नाही तर ती ब्रिजच्या दृष्टीने आगळीक आहे. नियमांमध्ये अशा आगळिकीला कायदेशीर उतारा आहे. ब्रिज स्पर्धामध्ये नेमलेला पंच याचा निवाडा करतो. स्पर्धा सुरळीत चालवण्याची जबाबदारी पंच मंडळींवर असते.

हुकमाचं हलकं पान खेळून प्रतिपक्षाच्या भारी पानाचं शिरकाण करण्यात एक वेगळीच मजा असते. ते भारी पान तुमच्या नावडत्या खेळाडूने खेळलेलं असलं तर.. पुढे केव्हा तरी चावडीवर मांडलेल्या डावांचं समालोचन करताना ही गम्मत अनुभवायला मिळेलच, पण तूर्तास हुकमाचा उपयोग दस्त वाढविण्याकरता कसा करता येतो, ते बघू या.

सोबतच्या आकृतीमध्ये इस्पिक हुकूम असेल तर ‘उद’युगुलाचे किती दस्त होतील? दक्षिणेने जर घायकुतेपणाने इस्पिक एक्का बादशहा वाजवून घेतले तर त्याचे एकूण दस्त फक्त तीनच होतील. बदाम एक्क्यावर पश्चिमेचा बादशहा आणि पूर्वेचा गुलाम पडेल, पण पुढचा बदामाचा दस्त पूर्वेची राणी जिंकेल. मात्र हुकमाच्या डावात दक्षिण आपल्या भात्यातलं मारती अस्त्र वापरू शकेल. पहिला दस्त तो बदाम एक्क्याने जिंकेल. दुसऱ्या दस्ताला बदाम दुरी खेळून तो उत्तरेच्या हुकमाच्या इस्पिक राणीने मारती घेईल आणि मग शेवटचे दोन दस्त त्याला इस्पिक एक्का बादशहा खेळून मिळतील. अशा प्रकारे चारही दस्त दक्षिणच जिंकेल!

(आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)

panja@demicoma.com