पीटीआय, सेंट लुईस (अमेरिका)

भारताचा जगज्जेता दोम्माराजू गुकेशसाठी ग्रँड बुद्धिबळ दौऱ्याचा भाग असलेल्या सेंट लुईस जलद (रॅपिड) व अतिजलद (ब्लिट्झ) स्पर्धेचा दुसरा दिवस विशेष राहिला नाही. त्याला एका फेरीत पराभूत व्हावे लागले. तर, अन्य दोन फेऱ्यांमध्ये त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूला बरोबरीत रोखले. या कामगिरीनंतर दहा खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत सहा गुणांसह गुकेशची संयुक्तपणे पाचव्या स्थानी घसरण झाली.

गुकेशला चौथ्या फेरीत अमेरिकेच्या अखेरच्या स्थानी असणाऱ्या सॅम शँकलँडकडून पराभूत व्हावे लागले. यानंतर फ्रान्सचा मॅक्सिम व्हॅचिएर-लाग्रेव्ह आणि उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोवविरुद्ध त्याने बरोबरीची नोंद केली. यादरम्यान अमेरिकेच्या फॅबियानो कारूआनाने लेव्हॉन अॅरोनियनला नमवीत दोन गुणांची आघाडी मिळवली. गुकेशप्रमाणेच अॅरोनियनला दोन डाव बरोबरीत सोडवता आले आणि एकामध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

जलद प्रारूपात आता केवळ तीन फेऱ्या शिल्लक असून फॅबियानो कारूआना १२ पैकी दहा गुणांसह आघाडीवर आहे. अॅरोनियन आठ गुणांसह अमेरिकेचा वेस्ली सो याच्यासह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. लाग्रेव्ह सात गुणांसह चौथ्या तर, गुकेश व लिनियर डोमिन्गुएज पेरेज संयुक्तपणे पाचव्या स्थानी आहे. उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव आणि व्हिएतनामचा लिएम ले क्वांग पाच गुणांसह संयुक्तपणे सातव्या स्थानावर आहेत. अमेरिकेचा ग्रिगोरी ओपरिन त्यांच्या दोन गुणांनी मागे आहे. सॅम शँकलँडने गुकेशला नमवीत दोन गुणांची कमाई केली. मात्र, तरीही तो अखेरच्या स्थानी कायम आहे.