पीटीआय, सेंट लुईस (अमेरिका)

भारताचा जगज्जेता दोम्माराजू गुकेशला अमेरिकेच्या लेव्हॉन ॲरोनियनकडून पहिल्या फेरीत मिळालेल्या पराभवानंतर पुनरागमन करताना ग्रिगोरी ओपेरिन आणि लिएम ले क्वांगविरुद्ध विजय नोंदवला. या कामगिरीमुळे गुकेश ग्रँड बुद्धिबळ दौऱ्यांतर्गत असलेल्या सेंट लुईस जलद (रॅपिड) आणि अतिजलद (ब्लिट्झ) बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी राहिला.

गुकेशची सुरुवात चांगली राहिली नाही आणि पहिल्या फेरीतील चुरशीच्या लढतीत त्याला ॲरोनियनकडून हार पत्करावी लागली. मात्र, यानंतर पुनरागमन करताना त्याने ओपेरिन व लिएम यांना नमवीत संभावित सहापैकी चार गुणांची कमाई केली. पहिल्या फेरीत कॅरो कान डिफेन्सने सुरुवात केल्याचा फटका गुकेशला बसला. गुकेशने दुसऱ्या फेरीत पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना ओपेरिनला सहज नमविले. अखेरच्या लढतीत त्याने लिएमविरद्ध काळ्या मोहऱ्यांसह खेळताना गुकेशला पुन्हा अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, गुकेशने त्याच्याविरुद्ध दबाव कायम राखत अखेर विजय नोंदवला.

लास वेगासमध्ये नुकत्याच झालेल्या फ्रीस्टाइल बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळवणाऱ्या अमेरिकेचा ग्रँडमास्टर ॲरोनियनने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव आणि फ्रान्सच्या मॅक्सिम-व्हॅचिएर लाग्रेव्हला नमवीत चमक दाखवली. ॲरोनियन सहा गुणांसह शीर्ष स्थानी आहे. तर, फॅबियानो कारूआना दोन विजय आणि एका बरोबरीसह पाच गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. गुकेश व अमेरिकेचा वेस्ली सो संयुक्तपणे तिसऱ्या, लाग्रेव्ह व लीनियर डोमिन्गुएज पेरेज तीन गुणांसह संयुक्त पाचव्या स्थानावर आहे. लिएम व ओपेरिन प्रत्येकी दोन गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत. नोदिरबेकच्या खात्यात एक गुण आहे तर, सॅम शँकलँड सर्व लढतीत पराभूत झाल्यानंतर अखेरच्या स्थानी आहे.