एकेकाळी डोमेस्टिक क्रिकेटमधली मानाची स्पर्धा अशी ओळख असलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेची रया गेल्याचं चित्र आहे. यंदा सुरू झालेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं टीव्हीवर थेट प्रक्षेपण उपलब्ध नाहीये. एकीकडे दिल्ली प्रीमिअर लीग, उत्तर प्रदेश प्रीमिअर लीग, महाराजा ट्रॉफी अशा स्थानिक राज्य पातळीवरील स्पर्धांचं प्रक्षेपण टीव्हीवर उपलब्ध आहे मात्र भारतीय क्रिकेटचा अविभाज्य भाग असलेल्या स्पर्धेला प्रक्षेपण मिळू नये हे एक आश्चर्यच आहे.
यंदाच्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेचे सामने बंगळुरूतल्या बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स इथे सुरू झाले. देशातील अव्वल खेळाडू या सामन्यात खेळले मात्र या सामन्यांचं थेट प्रक्षेपण टीव्हीवर उपलब्ध नव्हतं. दुसरीकडे मैदानात प्रत्यक्ष येऊन हे सामने पाहण्याची चाहत्यांची संधीही नाकारण्यात आली. काही दर्दी चाहते हे सामने पाहण्यासाठी मैदानात पोहोचले. त्यांना तारांच्या कुंपणावरून वायरींच्या मधून सामन्याचा आस्वाद घ्यावा लागला. एकीकडे आयपीएलला हजारोंची गर्दी लोटत असताना बाकी डोमेस्टिक स्पर्धा चाहत्यांविना अस्तंगत होत असल्याचे चित्र आहे.
गेल्या हंगामात बंगळुरूजवळच्या अलूर इथे कर्नाटक-केरळ सामन्यावेळी संजू सॅमसनचा खेळ पाहण्यासाठी काही चाहते मैदानात पोहोचले. मात्र त्यांना पांगवण्यात आलं. या मैदानात प्रेक्षकांना बसून सामना पाहता येईल असे स्टँड्स नाहीत हे कारण देण्यात आलं. सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाने सांगितलं. देशभरात क्रिकेटप्रति चाहत्यांचा उत्साह लक्षात घेता असे स्टँड्स उभारणं प्रशासनाला कठीण नाही मात्र डोमेस्टिक सामन्यांप्रति अनास्था हे यामागचं कारण आहे.
३० सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या महिला वनडे वर्ल्डकपच्या तिकिटांची विक्री अजूनही सुरू झालेली नाही. २०२३ मध्ये भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात धरमशाला इथे होणारा कसोटी सामना अगदी आयत्यावेळी रद्द करून अन्यत्र खेळवण्यात आला. धरमशाला इथे पोहोचणं भौगोलिकदृष्ट्या अवघड आहे. सामना ऐनवेळी दुसरीकडे हलवल्याने चाहत्यांना मनस्ताप झाला. कोट्यवधी चाहते असलेल्या खेळाची ही अवस्था आहे. बाकी खेळांची कल्पनाच केलेली बरी.