ऋषिकेश बामणे
भारताच्या पहिल्यावहिल्या अल्टिमेट खो-खो लीगचा थरार अनुभवण्यासाठी चाहत्यांना किमान पुढील आठ महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. करोना विषाणूच्या संसर्गामुळे क्रीडा स्पर्धा आणि परदेशी खेळाडूंसदर्भात घालण्यात आलेले निर्बंध यामुळे ८ ते २९ मार्चदरम्यान होणारी ही लीग आता थेट २७ नोव्हेंबर ते २० डिसेंबरदरम्यान रंगण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय खो-खो महासंघाचे सरचिटणीस महेंद्रसिंग त्यागी यांनी दिली.
गतवर्षी एप्रिल महिन्यात अल्टिमेट लीगची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यावेळी ऑक्टोबर महिन्यात लीगच्या पहिल्या पर्वाला सुरुवात होईल, असे जाहीर करण्यात आले. परंतु राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामुळे ही लीग आधी नोव्हेंबर-डिसेंबपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर पुन्हा राज्यातील राजकीय घडामोडी आणि प्रक्षेपणातील समस्येमुळे फेब्रुवारी महिन्याचा मुहूर्त ठरवण्यात आला.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस स्पर्धेच्या आयोजनाची तारीख आणखी एक महिना पुढे ढकलून ८ ते २९ मार्च अशी करण्यात आली. मात्र स्टार स्पोर्ट्स क्रीडा वाहिनीकडून संपूर्ण २१ दिवसांच्या सामन्यांचे प्रक्षेपण करण्यासाठी वेळेचे नियोजन होत नसल्याने आणि देशभरात थैमान घातलेल्या करोनाच्या भीतीमुळे आता ही लीग वर्षांखेरीस रंगण्याची शक्यता आयोजकांकडून वर्तवण्यात येत आहे.
‘‘विदेशी खेळाडूंना भारतात आणण्यासाठी महासंघाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेबरोबरच थेट प्रक्षेपणासंबंधाचा करारही अद्याप निश्चित झालेला नाही. त्यामुळे हे सर्व सुरळीतपणे आखणी करण्यासाठी महासंघाला आणखी काही काळ लागेल,’’ असे भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव यांनी सांगितले.
‘‘स्टार स्पोर्ट्स वाहिनीशी अद्यापही करार पक्का न झाल्याने आम्ही सोनी वाहिनीकडे मोर्चा वळवला आहे. त्यांनी दिलेल्या मुदतीनुसार नोव्हेंबर-डिसेंबरच्या तारखा तूर्तास निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय सध्या भारताबरोबरच विदेशातील खेळाडूंनीसुद्धा करोनापासून स्वत:चे संरक्षण करण्याच्या हेतूने विविध स्पर्धातून माघार घेण्याचे ठरवले असल्याने अल्टिमेट लीगव्यतिरिक्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळवरील अन्य खो-खो स्पर्धाचे वेळापत्रकही कोलमडले आहे,’’ असे भारतीय खो-खो महासंघाचे सरचिटणीस महेंद्रसिंग त्यागी यांनी सांगितले.