उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी ठरलेल्या खेळाडूंबाबत जबाबदार धरून त्यांच्या आठ प्रशिक्षकांवर दोन वर्षे बंदीची कारवाई करण्याचा निर्णय भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाने घेतला आहे. तसेच  दिल्ली, पंजाब, हरयाणा व मणिपूर या राज्यांच्या संघटनांना एक वर्षांकरिता बडतर्फ करण्यात आले आहे.
विविध स्पर्धाच्या वेळी व स्पर्धाव्यतिरिक्त काही खेळाडूंच्या घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत यंदा २६ खेळाडू दोषी आढळले. या खेळाडूंवर झालेल्या कारवाईस नैतिक जबाबदार धरून आठ प्रशिक्षकांवर बंदी घालण्यात आली आहे.
बंदी घातलेल्या प्रशिक्षकांमध्ये दिल्लीचे रविकुमार, एस.के. बक्षी, वीरेंद्र कुमार यांचा समावेश आहे. तसेच मणीपूरचे दोन प्रशिक्षक, मध्य प्रदेश, पंजाब व ओडिशाच्या प्रत्येकी एका प्रशिक्षकावर ही कारवाई झाली आहे.
‘‘बंदी घालण्यात आलेले बरेचसे खेळाडू राष्ट्रीय युवा व कनिष्ठ स्पर्धेत दोषी आढळले होते. हे गंभीर आहे. बंदीचा कालावधी ठरवण्याची जबाबदारी राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीकडे (नाडा) देण्यात आली आहे,’’ असे महासंघाचे सरचिटणीस सहदेव यादव म्हणाले.