माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतच्या फलंदाजीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या परिपक्वतेसह पंतने फलंदाजी केली त्यावरून कैफ खूप आनंदी आहे. त्याने पंतचे कौतुक केले. कैफ म्हणाला, ”ऋषभ पंतला त्याच्या विकेटचे महत्त्व समजले. मी पंतला एक मेसेज केला होता, मात्र त्याने रिप्लाय दिला नाही.”

ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात पंतने चांगली फलंदाजी केली. त्याने १०६ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या. महत्त्वाची गोष्ट अशी, की पंतने त्याच्या आक्रमक शैलीला दूर ठेऊन फलंदाजी केली. त्याने या डावात फक्त चार चौकार मारले. पंतने शार्दुल ठाकूरसोबत उत्तम भागीदारी खेळत भारतीय संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले.

हेही वाचा – टी-२० वर्ल्डकपसाठी पाकिस्ताननं संघात घेतले दोन ‘सुपरफ्लॉप’ फलंदाज; हेड कोचचा राजीनामा

मोहम्मद कैफ म्हणाला, “मी पंतला आपल्या बचावावर विश्वास ठेव, असा मेसेज केला होता. त्याने मला रिप्लाय दिला नाही, परंतु त्याने त्याच्या बॅटने उत्तर दिले. मला खूप आनंद झाला, की त्याने त्याच्या विकेटची किंमत ओळखली. त्याने स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला. तो बचावात्मक खेळला आणि चेंडू सोडत राहिला. त्याच्या बचावामध्ये कोणतीही कमकुवतता दिसून आली नाही. भविष्यात तो एक चांगला खेळाडू होईल. तुम्ही फक्त मोठे शॉट खेळून धावा काढू शकत नाही.”

मोहम्मद कैफच्या मते, पंतने रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजांकडून शिकले पाहिजे. तो म्हणाला, “मला माहीत नाही, की तो डायरी ठेवतो की नाही. पण त्याने रोहित शर्मा, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांची नावे डायरीत लिहावीत. हे खेळाडू पंतचे हिरो असले पाहिजेत आणि त्याने या खेळाडूंना पाहून शिकले पाहिजे.”