Tristan Stubbs: क्रिकेटमध्ये खेळातील कौशल्यासह नशीब चांगलं असणंही तितकंच महत्वाचं असतं. कधी कधी कठीण वाटणारे झेल सहज पकडले जातात. तर कधीकधी अनुभवी खेळाडूंकडून सोपा झेलही सुटून जातो. दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्ससोबतही असंच काहीसं घडलं आहे. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात तो आगळ्या वेगळ्या पद्धतीने बाद होणार होता, पण नशीब चांगलं असल्यामुळे तो थोडक्यात बचावला. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तिफान व्हायरल होऊ लागला आहे.
लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात ट्रिस्टन स्टब्सने दमदार अर्धशतकी खेळी केली. यादरम्यान एक असा प्रकार घडला, जे पाहून सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला. तर झाले असे की, ट्रिस्टन स्टब्स फलंदाजी करत असताना इंग्लंडकडून साकीब महमूद गोलंदाजी करत होता. साकीबच्या षटकात फलंदाजी करताना ट्रिस्टन स्टब्सने बॅक फूटवरून शॉट खेळण्यासाठी बॅट फिरवली. त्यावेळी त्याच्या हातून बॅट निसटली. बॅट हवेत उडून स्टम्पला लागणार होती, गोलंदाजाला वाटलं की तो हिट विकेट झाला आहे. पण ट्रिस्टन स्टब्सला नशिबाची साथ मिळाली, हवेत उडालेली बॅट स्टंपच्या १ इंच बाजूला जाऊन पडली. त्यामुळे तो थोडक्यात बचावला.
ही घटना या सामन्यातील ३१ व्या षटकात घडली. ट्रिस्टन स्टब्सने फलंदाजी करत असताना बॅकफूटवर जाऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या बॅटवरील ताबा सुटला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होताच बॅट हवेत उडाली. सर्वांना असंच वाटलं होतं की, बॅट स्टंपला जाऊन लागणार. पण असं काहीच झालं नाही.
नशिबाने त्याला एक संधी दिली, पण तो या संधीचा फायदा घेऊ शकला नाही. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर तो ४१ व्या षटकात ५८ धावा करून माघारी परतला. पण त्याच्या या अर्धशतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ मजबूत स्थितीत पोहोचला. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ५० षटकांअखे ३३० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला ५० षटकांअखेर ९ गडी बाद ३२५ धावा करता आल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने या अटीतटीच्या लढतीत ५ धावांनी बाजी मारली.