Ben Duckett Century News : इंग्लंड आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ४ दिवसीय कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. दोन्ही संघ बऱ्याच वर्षांनी कसोटी सामना खेळण्यासाठी आमनेसामने आले आहेत. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी तुफान सुरूवात केली आहे. संघातील सलामीवीर फलंदाज बेन डकेटने सलामीला फलंदाजी करताना झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने अवघ्या १०० चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक ठरले आहे. मात्र, हे शतक अतिशय खास ठरलं आहे.

बेन डकेटचं शतक पूर्ण

बेन डकेटने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ५ शतकं झळकावली आहेत. हे शतक त्याच्यासाठी अतिशय खास आहे. कारण त्याने पहिल्यांदाच मायदेशात खेळताना शतक झळकावलं आहे. तर दुसरं मुख्य कारण म्हणजे, त्याने दुसऱ्यांदा १०० किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आहे. बेन डकेट इंग्लंडकडून असा कारनामा करणारा पहिलाच फलंदाज नाही. यापूर्वी जॉनी बेअरस्टो, जॅक क्रॉली आणि हॅरी ब्रुक यांनी देखील कसोटी क्रिकेटमध्ये असा कारनामा केला आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या बेन डकेटने १३४ चेंडूत १४० धावांची खेळी केली. त्यानंतर तो झेबलाद होऊन माघारी परतला. आतापर्यंत जॅक क्रॉली ९० धावांवर नाबाद आहे. तर ओली पोपने ३९ धावा केल्या आहेत. इंग्लंडने ५० षटकांपर्यंत २८२ धावा केल्या आहेत.

बेन डकेटची कारकिर्द

बेन डकेटच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतपर्यंत ३३ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंड संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यादरम्यान त्याने ५ शतकं आणि १३ अर्धशतकं झळकावली आहेत. यादरम्यान त्याने ४० पेक्षाही अधिकच्या सरासरीने धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २२७० धावा केल्या आहेत.

तर वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २२ सामन्यांमध्ये १०५८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतकं आणि ६ अर्धशतकं झळकावली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.