ENG-W vs IND-W: भारताचा महिला संघ देखील इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला संघाने ३-२ ने बाजी मारली. आता दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडवर ४ गडी राखून दमदार विजयाची नोंद केली. हा भारतीय संघाचा गेल्या १२ सामन्यातील ११ वा विजय ठरला आहे. भारतीय महिला संघाने २०२४ मध्ये वेस्टइंडिजला पराभूत करून या विजयी मालिकेला सुरूवात केली होती.
भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघांमध्ये पार पडलेला पहिला सामना हा साउथॅम्टनच्या द रोज बाऊल स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात इंग्लंडची कर्णधार नेट सिव्हर ब्रंटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडकडून फलंदाजी करताना डेविडसन रिचर्ड्स आणि सोफिया डंकले यांनी दमदार अर्धशतकं झळकावली. या खेळीच्या बळावर इंग्लंडने ५० षटकांअखेर ६ गडी बाद २५८ धावा केल्या.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २५९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून दीप्ती शर्माने दमदार फलंदाजी केली. तिने धावांचा पाठलाग करताना ६४ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ३ चौकार आणि १ लक्षवेधी षटकार मारला. या षटकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जेमीमा रॉड्रिग्जने ४८ आणि प्रतिका रावलने ३६ धावांची खेळी केली.
दीप्ती शर्माचा एकहाती षटकार
दीप्ती शर्माने एका हाताने मारलेल्या षटकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डावखुऱ्या हाताची फलंदाज दीप्तीने एका हाताने वेगाने बॅट फिरवून चेंडू सीमारेषेपार पोहोचवला. तर झाले असे की, इंग्लंडकडून लॉरेन बेल गोलंदाजी करत असताना दीप्ती शर्मा स्ट्राइकवर होती. त्यावेळी बेलने गुड लेंथवर चेंडू टाकला. दीप्तीने जोरात बॅट फिरवली. चेंडू बॅटच्या मध्यभागी जाऊन लागला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होताच, चेंडू मिडविकेटच्या दिशेने स्टँड्समध्ये जाऊन पडला. हा षटकार पाहून तुम्हाला ऋषभ पंतची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
यासह दीप्ती शर्माच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. भारतीय संघाकडून धावांचा पाठलाग करताना दीप्तीने सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वात मोठी खेळी करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. याआधी हा रेकॉर्ड वेदा कृष्णमूर्तीच्या नावावर होता. तिने २०१६ मध्ये वेस्टइंडिजविरूद्ध फलंदाजी करताना नाबाद ५२ धावांची खेळी केली होती.