गुवाहाटी : महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीचा पहिला सामना उद्या, बुधवारी दक्षिण आफ्रिका आणि चार वेळचे विजेते इंग्लंड यांच्यात होईल, तेव्हा फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजांमधील एक अनोखे द्वंद्व बघायला मिळेल.
उपांत्य फेरीपर्यंतच्या प्रवासात दक्षिण आफ्रिकेला दोन मोठ्या पराभवांना सामोरे जावे लागले आहे. साखळी फेरीतील पहिल्या, तसेच शेवटच्या सामन्यात त्यांची फलंदाजी कोसळली. यात अनुक्रमे इंग्लंडविरुद्ध ६९ धावांत, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९७ धावांत दक्षिण आफ्रिकेचा डाव आटोपला होता. मात्र, या दरम्यान झालेल्या सामन्यांत न्यूझीलंड, भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवताना त्यांच्या फलंदाज यशस्वी ठरल्या होत्या. यातही नदीन डी क्लर्कची फलंदाजी निर्णायक ठरली होती.
इंग्लंड पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या या उणिवेचा फायदा घेण्यासाठी प्रयत्नशील राहील. सोफी एक्लेस्टोन, लिन्से स्मिथ आणि चार्ली डीन या तीन फिरकी गोलंदाजांवर त्यांची मदार असेल. गेल्या सामन्यात एक्लेस्टोन जायबंदी झाली असली, तरी इंग्लंडचे संघ व्यवस्थापन तिच्या उपलब्धतेबाबत आशावादी आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार लॉरा वोल्वार्ड तितकीशी लयीत नाही. मात्र, मारिझन काप, डी क्लर्क, अयाबोंगा खाका आणि क्लोइ ट्रायॉन यांनी फलंदाजीत चांगले सातत्य दाखवले आहे.
प्रमुख फलंदाज ताझ्मिन बिट्स एका शतकाचा अपवाद वगळता पूर्ण अपयशी ठरली आहे. आता महत्त्वाच्या सामन्यात तिला लय गवसणे दक्षिण आफ्रिकेसाठी निर्णायक ठरू शकते. दुसरीकडे माजी कर्णधार हेदर नाईट, तसेच विद्यमान कर्णधार नॅटली स्किव्हर-ब्रंट, एमी जोन्स, टॅमी ब्युमोंट आणि सोफिया डन्कले यांच्यावर इंग्लंड संघाची मदार असेल.
वेळ : दुपारी ३ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.
पावसाची शक्यता
मोंथा चक्रीवादळामुळे गुवाहाटी येथील उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सामन्यासाठी राखीव दिवस असला तरी नियोजित दिवशी अर्थात बुधवारीच सामन्याचा निकाल लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यात षटके कमी करून सामना संपविण्याचा प्रयत्न होईल. मात्र, ते शक्य न झाल्यास राखीव दिवशी सामना खेळवला जाईल. राखीव दिवशीही पावसामुळे सामना रद्द करावा लागल्यास साखळी फेरीअंती गुणतालिकेत वरच्या स्थानावर असणारा संघ थेट अंतिम फेरी गाठेल. गुणतालिकेत इंग्लंड दुसऱ्या, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला होता. त्यामुळे दोनही दिवस खेळ होऊ न शकल्यास इंग्लंड संघ आगेकूच करेल.
