Akash Deep: एजबस्टनच्या मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने एजबस्टनच्या मैदानावर पहिल्याच विजयाची नोंद केली आहे. फलंदाजीत गिलने दमदार खेळ केला. त्याने पहिल्या डावात २६९ तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना १६१ धावांची खेळी केली. तर गोलंदाजीत आकाशदीप चमकला. आकाशने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ४ तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना ६ गडी बाद केले. यासह दोन्ही डावात मिळून त्याने १० गडी बाद केले. आकाशदीप ३९ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये १० गडी बाद करणारा गोलंदाज ठरला.

भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरल्यानंतर आकाशदीपवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत आकाशदीप अशी कामगिरी करेल, असा कोणीच विचार केला नव्हता. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतले आहे. एजबस्टनमध्ये स्टेडियमच्या बाहेर असलेल्या एका चाहत्याने आकाशदीपवर चक्क गाणं तयार केलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तुम्ही फुटबॉलमध्ये अनेकदा पाहिलं असेल, की सामना पाहण्यासाठी आलेले चाहते आपल्या आवडत्या संघासाठी किंवा खेळाडूसाठी गाणं गातात. क्रिकेटमध्येही हा ट्रेंड सुरू झाला आहे. भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी भारत आर्मी आहे. तर इंग्लंडला सपोर्ट करण्यासाठी बार्मी आर्मी आहे. बार्मी आर्मीने अनेकदा भारतीय खेळाडूंना ट्रोल केलं आहे. पण इंग्लंडमध्ये सामना खेळण्यासाठी आलेल्या खेळाडूसाठी पहिल्यांदाच गाणं गायलं गेलं असावं.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की स्टेडियमबाहेर असलेला एक चाहता हातात गिटार घेऊन आकाशदीपसाठी गाणं गाताना दिसून येत आहे. आकाशदीपने इंग्लंडच्या फलंदाजांची बत्ती गुल केल्यानंतर हे गाणं गायलं गेलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आकाशदीपची शानदार गोलंदाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एजबस्टन कसोटीसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी आकाशदीपचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला. या संधीचा आकाशदीपने चांगला फायदा घेतला. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना ४ गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात त्याने इंग्लंडच्या ६ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. यासह तो इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात १० गडी बाद करणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.